गंभीर! कोकणचा काजू जागतिक बाजारपेठेत खातोय गटांगळ्या

Cashews issue konkan sindhudurg
Cashews issue konkan sindhudurg

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - चवीला सर्वोत्कृष्ट, इतर काजूपेक्षा प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सीचे अधिक प्रमाण, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे चांगले प्रमाण, असे सर्व गुणधर्म असलेला जिल्ह्यातील काजू सध्या जागतिकीकरणाच्या बाजारपेठेत गटांगळ्या खात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काजू बागायतदार आणि जाणकारांनी कोकणातील काजू इतर काजूपेक्षा वेगळा असल्याचे सिद्ध करणे आवश्‍यक आहे. तशा प्रकारचे जिल्ह्यातील काजूचे ब्रॅंडिंग होण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

जगभरातील अनेक देशांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने ब्राझील, व्हिएतनाम, आफ्रिका, इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, कर्नाटक, ओडिशा, गुजरात, तमिळनाडू या राज्यांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते. असे असले तरी देशात सर्वाधिक काजूचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात काजू लागवडीखाली आहे.

काजूचे उत्पादन सर्वत्र घेतले जात असले तरी कोकणातील काजूमध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आढळतात. किनारपट्टीच्या या जिल्ह्यातील काजूला उत्तम दर्जाची चव तर आहेच; परंतु त्यामध्ये शरीराला आवश्‍यक असलेल्या प्रोटीन, व्हीटॅमिन "बी', "सी', आणि "के' चे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाणही आहे. त्यामुळे कोकणातील काजूची तुलना इतर ठिकाणच्या काजूशी होऊ शकत नाही; परंतु असे असले तरी आपला दर्जेदार काजू सध्या कवडीमोलाने विकला जात आहे. त्याला कारणेही तशीच आहेत.

आपल्या काजूतील गुणवैशिष्टे पोहोचविण्यात येथील बागायतदार आणि काजू तज्ज्ञांना यश आलेले नाही. नियमित वापरण्यात येणारा बदाम आणि म्हांबरा बदाम (वाकडा बदाम) यामध्ये वर्गीकरण केले आहे. म्हांबरा बदाममध्ये वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्याचे पटवून दिले आहे. त्यामुळे नियमित बदाम 700 ते 800 रूपये आणि म्हांबरा बदाम 2 हजार 800 ते 3 हजार 200 रूपयांनी किलो विकला जातो. तशाच पद्धतीने आता कोकणातील काजू आणि इतरील काजू यातील फरक सिद्ध करून कोकणातील काजूचे स्वतंत्र ब्रॅंडींग होण्याची गरज आहे. 

काजूच्या स्वतंत्र ब्रॅंडींगसाठी कोकणातील बागायतदार, काजूशी निगडीत घटक आणि राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काजूच्या दरात घसरण झाली तर जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होतो. त्यामुळे आपआपसांतील राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून जिल्ह्यातील काजूच्या ब्रॅंडींगसाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

सिंधुदुर्गातील काजू हा उच्च दर्जाचा आहे; परंतु मार्केटिंगअभावी तो मागे पडत आहे. ज्याप्रमाणे बागायतदारांनी शास्त्रीय पध्दतीने काजू लागवड, कीड, खत व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले त्याप्रमाणे आता काजूचे मार्केटिंग स्किल शिकणे आवश्‍यक आहे. मुंबई, पुणे या शहरांमध्ये कोकणातील काजूची स्वतंत्र ओळख करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. 
- विवेकानंद नाईक, कृषी पर्यवेक्षक तथा काजू अभ्यासक 

प्रकिया उद्योग हवेत 
काजू बी चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सहकारी तत्वावर प्रकिया उद्योग उभे राहणे आवश्‍यक आहे. फक्त काजू बी पासून काजूगराच्या निर्मितीवर न थांबता काजूगरांपासून विविध उत्पादने तयार करण्याचे उद्योग आणि त्याला बाजारपेठ मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

* किनारपट्टी जिल्ह्यातील काजूगरांमध्ये विशिष्ट गुणधर्म 
* बागायतदारांना मार्केटिंग स्कीलचे प्रशिक्षण देणे गरजेचे 
* सहकारी तत्त्वावर प्रकिया उद्योग उभे राहणे आवश्‍यक 
* ओला काजू विक्री करण्यावर भर देणे गरजेचे 
* कोकण आणि इतरील काजूतील फरक पटवून देण्याची आवश्‍यकता 

संपादन - राहुल पाटील
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com