खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या सात जणांना वनविभागाने पकडले

अमित गवळे
रविवार, 5 मे 2019

- पाली वनविभागाने केली ही कारवाई.

पाली (जिल्हा : रायगड) : सुधागड तालुका वन्यजीव तस्करांचे केंद्र बनले आहे. तालुक्यात अंधश्रध्दा, काळीजादू व औषधासाठी विविध दुर्मिळ वन्यप्राणी व त्यांच्या अवयवांची तस्करी होण्याच्या घटना वारंवार समोर आल्या आहेत. पाली वनविभागाने शनिवारी (ता.4) सायंकाळी खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या सात तस्करांना पकडले. पाली दिवानी न्यायालयाने गुरुवार (ता.9) पर्यंत यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

काही महिन्यांपूर्वी सुधागड तालुक्यात दुर्मिळ प्रजातीचे व करोडे रुपये किमतीचे मांडुळाची तस्करी करणार्‍यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तसेच बिबट्याच्या नख्यांची तस्करी करणार्‍यांना देखील वनविभागाने पकडून कारवाई केली होती. त्यामुळे सुधागड तालुका दुर्मिळ वन्यजिव प्राणी व त्यांच्या अवशेषांची तस्करी करणारे केंद्र बनले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की सहा. वनसंरक्षक अलिबाग, वनक्षेत्रपाल पेण, वनक्षेत्रपाल येउर (स.गा.रा.उ. बोरीवली) वनक्षेत्रपाल सुधागड यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पाली वाकण रोडवरील पिराचा माळ येथे संशयित कार तपासली असता सुनिल काशिनाथ माने यांच्या कारच्या डिक्कीत गोणपाटात झाकून ठेवलेले खवले मांजर व एक पिल्लू दिसून आले. त्यानुसार खवले मांजर व तिचे पिल्लू, कार आणि साथीदारांची मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली.  

याप्रकरणी अशोक बबन वाघमारे (वय 27) रा. पंदेरी, ता. मंडनगड, शौकत नशिर मोमीन (वय 44), सुनिल काशिनाथ माने रा. पोयनाड, ता. अलिबाग,  यांच्यासह त्यांचे सोबत असणारे चंद्रहास शंकर पाटील (वय 49) रा. मु. डोलवी, ता.पेण, नितीन नारायण पाटील (वय 35) रा. सातघर, ता. अलिबाग, संदीप दत्ताराम हिलम (वय 39) रा. कुंभशेत, ता. माणगाव, ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील (वय 44) रा. शेतजुई यांना पकडण्यात आले. या कारवाईबद्दल सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे व त्यांचे सहकारी वनपाल जी.बी परहर, वनपाल महेंद्र दबडे व मजरे जांभुळपाडा वनविभाग कर्मचारी  यांचे कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cat Smuggling 7 Peoples Arrested in Sudhagad