माथेरानच्या जुम्मापट्टीत गुरे चोरीच्या घटना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नेरळ - नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर असलेल्या जुम्मापट्टी; तसेच माणगाव वाडीमधील गुरांची रात्री चोरी होत असल्याच्या घटना पुन्हा घडल्या आहेत. परिसरातील तीन गुरांना भूल येणारे इंजेक्‍शन देऊन पळवून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला; मात्र इंजेक्‍शन दिलेल्या एका गुराचा मृत्यू झाला आहे. 

नेरळ - नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर असलेल्या जुम्मापट्टी; तसेच माणगाव वाडीमधील गुरांची रात्री चोरी होत असल्याच्या घटना पुन्हा घडल्या आहेत. परिसरातील तीन गुरांना भूल येणारे इंजेक्‍शन देऊन पळवून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला; मात्र इंजेक्‍शन दिलेल्या एका गुराचा मृत्यू झाला आहे. 

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जुम्मापट्टी भागात गुरे चोरीच्या घटना याआधीही घडल्या आहेत. तालुक्‍यातील अनेक भागात हिवाळ्यात अशा घडतात. पाच वर्षांपूर्वी कर्जत तालुक्‍यातील वंजारवाडी येथे ग्रामस्थांनी गुरे चोरून नेणारी बोलेरो गाडी पकडली होती. आता पुन्हा असे प्रकार वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जनावर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपयांची तजवीज करावी लागते. तसेच त्यांना सांभाळण्याचा आणि देखभालीचा खर्चही असतो. मेहनत करून सांभाळलेली गुरे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  

सुमारे १५ दिवसांपूर्वी माणगाव वाडीतील तीन गुरांना चोरट्यांनी भुलीचे इंजेक्‍शन दिले होते. इंजेक्‍शन देऊन गुरे चोरण्याचे प्रकार होत आहेत; मात्र जागरूक ग्रामस्थांमुळे चोरट्यांचा डाव फसला होता. १८ जानेवारीला पहाटे देन वाजण्याच्या सुमारास वाडीतील नागरिक गाढ झोपेत असताना शेतकरी प्रकाश शिंगाडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या म्हशींना भुलीचे इंजेक्‍शन देऊन पळवण्याचा प्रयत्न सुरू होता. एका गुराला इंजेक्‍शनचा डोस जास्त झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे चोरट्यांनी मृत जनावराला तिथेच टाकून पळ काढला. या इंजेक्‍शनचा प्रभाव ४ ते ५ तास असतो. त्यानंतर जनावर पूर्वपदावर येते. गुरे चोरीच्या वाढत्या घटनांबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनी तातडीने तपास करावा, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी तातडीने योग्य पावले उचलली नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा प्राणिमित्र गोरख शेप यांनी दिला आहे.

Web Title: cattle theft incident