'लॉकरची चावी द्या, नाहीतर ठार मारू'; सेंट्रल बँकेत थरार, दरोडेखोरांनी शिपायांवर झाडल्या गोळ्या I Ratnagiri Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Bank Robbery

चावीने लॉकर उघडून सुमारे ८ लाखाची रोकड या दरोडेखोरांनी पळवली. बँकेत एवढा थरार आणि घात झाल्याचा बाहेर कुणालाही थांगपत्ता नव्हता.

Ratnagiri Crime : 'लॉकरची चावी द्या, नाहीतर ठार मारू'; सेंट्रल बँकेत थरार, दरोडेखोरांनी शिपायांवर झाडल्या गोळ्या

रत्नागिरी : तालुक्यातील (Ratnagiri) जाकादेवी येथील सेन्ट्रल बँकेच्या (Central Bank) शाखेवर सहा संशयितांनी भर दुपारी सशस्त्र दरोडा घातला होता. लॉकरची चावी देण्यास उशीर करणाऱ्या आणि सायरन वाजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही शिपायांवर रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला.

यात एक जागीच ठार झाला; तर दुसरा गंभीर झाला होता. दरोडेखोरांनी लॉकरमधून ८ लाखांची रोकड घेऊन ते पसार झाले. ग्रामीण पोलिसांना दरोड्याची खबर दिली; परंतु पोलिस (Police) यंत्रणेला दरोडेखोरांना रोखण्यात अपयश आले.

दरोडेखोरांच्या टोळीतील प्रमुख सीसीटीव्ही फुटेजमध्ये आला आणि त्या धाग्यावरून पोलिसांनी १२ दिवसांत हा दरोडा उघड केला होता. जिल्ह्याला हादरवून सोडणारी ही घटना नोव्हेंबर २०१३ ला भरदिवसा जाकादेवी भरबाजारपेठेत दुपारी पाऊण वाजता घडली. दरोडेखोर दोन दिवस या भागाची रेकी करत होते. मोटार घेऊन त्या भागात फिरत होते.

तेव्हा मोटारीचा क्रमांक वेगळा होता आणि दरोड्यावेळी वेगळा होता. या भागातून महामार्गावर जाण्यास ग्रामीण भागातून कोणते अंतर्गत रस्ते आहेत, याची पूर्ण माहिती दरोडेखोरांनी करून घेतली होती. जाकादेवी येथे सेंट्रल बँकेची शाखा आहे. या शाखेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. शिपाई म्हणून दोन पुरुष कर्मचारी ठेकेदारी पद्धतीवर असल्याची पुर्ण माहिती दरोडेखोरांनी काढली होती.

सुरेश सीताराम गुरव (वय ५२, रा. जाकादेवी) आणि संतोष शांताराम चव्हाण (वय ३२, रा. धामणसे) अशी त्या शिपायांची नावे आहेत. दुपारी एक वाजून ५५ मिनिटांनी दरोडेखोरांची मोटार बँकेच्या शाखेपुढे लागली. आलिशान गाडीतून साध्या वेशातील चार तरुण सिगारेट फुंकत बाहेर पडले. बँकेतील प्रत्येकजण कामात व्यग्र होता. काही क्षणांतच दरोड्याची घटना घडेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. दरोडेखोर थेट बँकेत शिरले. बँकेत काही शाळकरी मुले होते.

दरोडेखोरांनी त्यांच्यावरच रिव्हॉल्व्हर रोखून लॉकरची चावी द्या, नाहीतर एका-एका विद्यार्थ्याला ठार मारू,अशी धमकी दिली. तेव्हा शिपाई संतोष चव्हाण याने चावी देण्यास दिरंगाई केली. त्यामुळे दरोडेखोराने संतापून थेट त्याच्यावर गोळीबार केला. त्याच्या छातीत आणि पोटात दोन गोळ्या लागल्याने तो जागीच ठार झाला.

एवढ्यात सुरेश गुरव याने देखील धाडस करून सायरान वाजविण्यासाठी धाव घेतली. परंतु दरोडेखोरांनी त्याला तिथेच अडवून अगदी जवळून त्याच्या पोटात गोळी मारली. त्यामुळे बँकेत जोरदार रक्तपात झाला. दरोडेखोरांचा धुडगूस बँकेत सुरू होता. मॅनेजर आल्मा कविस्कर यांना दरोडेखोरांनी केस धरून बाहेर काढले. अन्य एका कर्मचाऱ्याला मारहाण केली.

Central Bank Robbery

Central Bank Robbery

चावीने लॉकर उघडून सुमारे ८ लाखाची रोकड या दरोडेखोरांनी पळवली. बँकेत एवढा थरार आणि घात झाल्याचा बाहेर कुणालाही थांगपत्ता नव्हता. दरोडेखोर गाडीमध्ये बसून सूसाट निघून गेल्यानंतर बँकेतील कर्मचारी आरडाओरड करीत बाहेर धावत आल्यानंतर बँकेवर दरोडा पडल्याचे लक्षात आले. परंतु तेव्हा उशीर झाला होता. दरोडेखोर त्या गाडीतून पसार झाले होते.

बाहेरील गुन्हेगारांवर लक्ष

पोलिसांपुढे या दरोड्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. विविध पथके यावर काम करत होते. तत्कालीन पोलिस अधीक्षक दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे फिरली. दरोड्यासंदर्भात मिळालेल्या विविध धाग्यांचा आधारे तपासाला गती मिळाली. स्थानिक एवढे मोठे धाडस करू शकत नाही, याचा अंदाज पोलिसांना होता. पोलिसांच्या हिटलिस्टवरचा गुन्हेगार सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत होता. त्यांच्यामार्फत पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला.