मध्यवर्ती जिल्हा बॅंकेला सीबीआयची क्‍लीन चिट - तानाजीराव चोरगे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

रत्नागिरी - नोटाबंदी काळात केंद्र शासनाच्या सूचनांचे पालन आणि बॅंक अधिकाऱ्यांनी केलेली अंमलबजावणी यामुुळे शासनाच्या कोणत्याही यंत्रणेला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत आक्षेपार्ह व्यवहार आढळले नाहीत. बॅंकेने पाचशे व हजारच्या ११२ कोटी ८३ लाख रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅंकेत जमा केल्या. बॅंकेकडे एकही रुपयांची जुनी नोट नाही, असा दावा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी केला.

जिल्हा बॅंकेत आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश दिवाकर, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्यासह बॅंकेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. चोरगे म्हणाले की, काही बॅंकांमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर शासनाने आरबीआय, सीबीआय, इन्कम टॅक्‍स ऑफिस, नाबार्ड यांना जिल्हा बॅंकांच्या चौकशीचे आदेश दिले. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा बॅंकेची तपासणी झाली. इन्कम टॅक्‍स स्टेटमेंट सादर करण्यात आले.

सीबीआयच्या पथकाची तपासणी झाली. खात्यात भरलेल्या रकमांचा लेखा-जोखा घेण्यात आला. तसेच बॅंकेच्या साडेसात हजार जन धन खात्यांचीही तपासणी झाली. त्यात कोणत्याही त्रुटी अथवा आक्षेपार्ह व्यवहार आढळला नाही. बॅंकेच्या नऊ तालुक्‍यांतील शाखांत ५ लाख २४ हजार ५१६ खाती असून बॅंकेच्या शंभर टक्के केवायसी पूर्ण झालेल्या १९ शाखा आहेत. ४ लाख ९४ हजार ५०८ खातेदारांनी केवायसी पूर्ण केली आहे. दहा हजार खात्यांची केवायसी लवकरच पूर्ण होतील. प्रक्रिया सुरू आहे. तसेच केवायसीमधील डॉरमेंट खाती म्हणजेच ज्यांचे आधार कार्ड, फोटो नाही अशा १९ हजार ९९० खात्यांना स्थगिती दिली आहे.

दरम्यान, शासनाच्या कॅशलेस व्यवहार योजनेतून बॅंकेच्या सावर्डे शाखेचे सिद्धार्थ शंभरकर व कुवारबाव शहर शाखेचे विजय कांबळे हे बक्षीसपात्र झाले आहेत. बॅंकेच्या खातेदारांमध्ये वाढ झाली तसेच कर्ज व्यवहारात फारशी अडचण आली नाही.

कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली
गेल्या ५० दिवसांत बऱ्याच अडचणी आल्या. स्टेट बॅंकेकडून चलनपुरवठा कमी आणि बॅंकेची मागणी जास्त होती. अडीच कोटींची मागणी असेल, तर बॅंकेला एक कोटी मिळत होते. त्यामुळे ग्राहकांना अडचणी आल्या. शासनाचा आदेश बंधनकारक आहे. नियमबाह्य काही करायचे नाही, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या; मात्र त्याचबरोबर ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यास बॅंकेचे अधिकारी-कर्मचारी यशस्वी झाले, अशी शाबासकी चोरगे यांनी कर्मचाऱ्यांना दिली.

Web Title: central district bank clean chit by cbi