दाखले मिळत नसल्याने मालवणात हाल

दाखले मिळत नसल्याने मालवणात हाल

मालवण -  येथील तहसील कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विविध दाखल्यांसाठी तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांचे हाल होत आहेत. यात आज तहसील कार्यालयात अधिकारीच उपस्थित नसल्याने ग्रामस्थांना दाखल्यांसाठी पुढील तारखा देण्यात आल्या. येत्या काळात दहावी, बारावी परीक्षांचा निकाल लागणार असून विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी मोठी धावपळ उडणार आहे. मात्र या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही नियोजन तहसील कार्यालयाने केलेले नाही. यामुळे यावर्षीही विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

एरव्ही सकाळी आठ वाजता उघडण्यात येणारे तहसील कार्यालय आज चक्क पावणे दहाच्या दरम्यान उघडण्यात आले. या वेळी कार्यालयात केवळ ऑपरेटर व अव्वल कारकून उपस्थित होते. अन्य एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता. याबाबतची माहिती घेतली असता सर्व अधिकारी ओरोस येथे बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. सोमवारचा दिवस असल्याने तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने विविध दाखले घेण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. मात्र अधिकारीच नसल्याने या ग्रामस्थांचे दाखले न मिळाल्याने गैरसोय झाली. वेळ व पैसा वाया गेल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. तहसील कार्यालयाच्या कारभाराबाबत अनेक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

येथील तहसीलदार म्हणून जलतरणपटू वीरधवल खाडे यांची नियुक्ती झाली होती. मात्र पायाच्या दुखापतीमुळे रजेवर गेलेले श्री. खाडे हे अद्यापही पदभार घेण्यास दाखल झालेले नाहीत. यामुळे गेले पाच महिने प्रभारी तहसीलदारांकडून कामकाज सुरू आहे. पावसाळा तोंडावर आल्याने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीचे निर्णय घेण्यासाठी सक्षम तहसीलदाराची आवश्‍यकता भासते. मात्र सध्या येथील तहसीलचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांतर्फे चालविला जात असल्याने अनेक समस्या भासणार आहेत. यामुळे या गंभीर समस्येकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून आवश्‍यक उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. सध्या मे महिना सुरू असल्याने आपल्या गावी आलेल्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिक विविध शासकीय कामे, दाखले घेण्यासाठी तहसील कार्यालयात येत आहेत. मात्र तहसील कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत असल्याचे चित्र आहे. तहसील कार्यालयाकडून विविध दाखले दिले जातात. हे दाखले किती मुदतीत मिळणार याची माहिती देणारा नागरिकांची सनद नावाचा फलक कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. प्रत्यक्षात दिलेल्या मुदतीनंतरही दाखले ग्रामस्थांना मिळत नसल्याने हा फलक केवळ दिखावा करण्यासाठीच आहे का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. काही दाखल्यांसाठी ग्रामस्थांना तलाठी कार्यालयात जावे लागते. मात्र बऱ्याचदा तलाठीच कार्यालयात नसल्याने ग्रामस्थांना हात हलवत माघारी परतावे लागते. त्यामुळे दाखले मिळवायचे तरी कसे असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com