कुडाळात दिसला गनिमी कावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

रस्ते अडविले - पोलिसांकडून सुमारे ८० जण ताब्यात
कुडाळ - विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी ७० ते ८० जणांना ताब्यात घेतले; मात्र पहाटेच्या दरम्यान गनिमी काव्याने महामार्गावर चार ते पाच ठिकाणी टायर जाळून, तसेच रस्त्यावर झाड तसेच चिरे टाकून वाहतूक कोंडी करून हे आंदोलन करण्यात आले. तालुक्‍यात इतर ठिकाणी रस्ते अडविण्यात आले.

रस्ते अडविले - पोलिसांकडून सुमारे ८० जण ताब्यात
कुडाळ - विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी ७० ते ८० जणांना ताब्यात घेतले; मात्र पहाटेच्या दरम्यान गनिमी काव्याने महामार्गावर चार ते पाच ठिकाणी टायर जाळून, तसेच रस्त्यावर झाड तसेच चिरे टाकून वाहतूक कोंडी करून हे आंदोलन करण्यात आले. तालुक्‍यात इतर ठिकाणी रस्ते अडविण्यात आले.

शासनदरबारी न्याय्य मागण्यांसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात लाखोंच्या उपस्थितीत मूक मोर्चे शांततेत काढण्यात आले होते. सिंधुदुर्गात २३ ऑक्‍टोबरला लाखोंच्या उपस्थितीत न भुतो न भविष्यती असा ऐतिहासिक मोर्चा झाला होता. एवढे मोर्चे काढून, शासनाचे लक्ष वेधूनही याकडे शासन डोळेझाक करीत आहे. शासनाला जाग यावी यासाठी आज राज्यात चक्का जाम आंदोलनाची भूमिका घेण्यात आली. त्यानुसार सिंधुदुर्गात समाजाने चक्का जाम आंदोलनाचा निर्णय घेतला. सर्वत्र सकाळी ११ ते दुपारी १ अशी आंदोलनाची वेळ होती. तालुक्‍यात छत्रपती शिवाजी महाराज यांची गनिमी कावा पद्धत आत्मसात करून पहाटेच्या दरम्यान मावळ्यांनी झाराप, तेर्सेबांबर्डे, पिंगुळी तिठा, गुढीपूर, पावशी, पणदूर, कुडाळ नवीन डेपो या ठिकाणी पोलिस येण्यापूर्वीच हे आंदोलन यशस्वी केले. या वेळी भंगसाळ नदीनजीक टायर जाळण्यात आले. रस्त्यावर झाड टाकण्यात आले. पावशी येथे रस्त्यावरच चिरे लावण्यात आल्याने महामार्गावर यशधरा हॉटेलपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिस यंत्रणेने ही वाहतूक कोंडी दूर केली. सकाळी अकराच्या दरम्यान सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, शिवराज्याभिषेक रायगड समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार सर्व मराठा बांधव हॉटेल यशधरा येथे जमा झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, आंदोलन शांततेत झाले पाहिजे यासाठी सहायक पोलिस निरीक्षक श्री. बाकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आरसीएफची तुकडी घटनास्थळी तैनात झाली होती.

रस्त्यावर आंदोलन केल्यास गुन्हे दाखल करण्याची सूचना श्री. बाकारे यांनी दिली होती. त्यानुसार सर्व समाजबांधव रस्त्यावर उतरण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणले. यामध्ये जिल्हा यूथ संस्थेचे श्रीनिवास गावडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेवक सचिन काळप, डॉ. अभय सावंत, चैताली भेंडे, प्रसाद दळवी, संग्राम सावंत, बंड्या सावंत, राजू राऊळ, वैभव परब, सुरेश राऊळ, जयराज राणे, रत्नाकर जेशी, अनिल नाईक, साक्षी सावंत, अश्‍विनी गावडे, नितीन सावंत, सुप्रिया मेहता यांच्यासह ७० ते ८० समाजबांधव भगिनी यांचा समावेश होता. एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

Web Title: chakka jam agitation in kudal