प्रचाराबरोबर वाढला संशयकल्लोळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

वैयक्तिक संपर्काला महत्त्व
एकूणच निवडणुका जवळ येतील तशी संभ्रमावस्था वाढत जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. जास्त बंडखोरीमुळे पक्षीय राजकारणापेक्षा उमेदवाराच्या वैयक्तिक जनसंपर्काला जास्त महत्त्व आल्याचे दिसत आहे. तसे झाल्यास निवडणुकीचे निकालही कोड्यात टाकणारे आणि काही ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण करणारे ठरण्याची शक्‍यता आहे.

सावंतवाडी- पालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढला असला तरी बंडखोरीमुळे या प्रचाराबाबतही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. वेंगुर्ले आणि मालवणमध्ये याची तीव्रता जास्त आहे.
तीन पालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्यापासून बंडखोरीची चर्चा सुरू होती. सर्वच पक्षांना याचे ग्रहण लागले. अर्ज मागारीच्या दिवसापर्यंत बहुसंख्य बंडखोरांची मनधरणी करण्यात त्या त्या पक्षाचे नेते कमी पडले. यामुळे जवळपास सर्वच ठिकाणी बंडखोरी कायम आहे. चारही ठिकाणी 71 जागांसाठी तब्बल 276 उमेदवार रिंगणात आहेत. या बंडखोरीचे तोटे आता प्रचारात दिसू लागले आहेत.
सध्या घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला जात आहे. जवळपास सगळ्याच निवडणूक क्षेत्रात या प्रचाराने वेग घेतला आहे; मात्र याबरोबरच नव्या राजकीय संशय कल्लोळाला सुरवात झाली आहे. उमेदवार प्रचार करताना आपल्यासोबत दुसऱ्या बंडखोर किंवा वैयक्तिक पातळीवर संबंध असलेल्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा संशय जवळपास सर्वच पक्षांना भेडसावत आहे. यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावरून राजकीय वावड्या उठण्याचे प्रमाणही जास्त आहे. मालवण आणि वेंगुर्लेत बंडखोरी केलेल्यांमध्ये काही बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्या ठिकाणी या संशयकल्लोळाची तीव्रता अधिक जाणवत आहे.

वैयक्तिक संपर्काला महत्त्व
एकूणच निवडणुका जवळ येतील तशी संभ्रमावस्था वाढत जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. जास्त बंडखोरीमुळे पक्षीय राजकारणापेक्षा उमेदवाराच्या वैयक्तिक जनसंपर्काला जास्त महत्त्व आल्याचे दिसत आहे. तसे झाल्यास निवडणुकीचे निकालही कोड्यात टाकणारे आणि काही ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण करणारे ठरण्याची शक्‍यता आहे.

Web Title: chaos due to campaigns

टॅग्स