राणे यांचे विमानतळाचे स्वप्न केसरकर यांनी पूर्ण केले - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

सिंधुदुर्गात विमानतळ व्हावे हे खासदार नारायण राणेंचे स्वप्न होते. चिपी विमानतळ पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या संकल्पाला मी पाठिंबा दिल्यामुळे विमानतळाचे आज लोकार्पण झाले.

मालवण - सिंधुदुर्गात विमानतळ व्हावे हे खासदार नारायण राणेंचे स्वप्न होते. चिपी विमानतळ पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या संकल्पाला मी पाठिंबा दिल्यामुळे विमानतळाचे आज लोकार्पण झाले. विमानतळामुळे विकासाची गती तीन पटीने वाढणार आहे. आपण जे जे ठरवले ते ते पूर्ण झाले आहे. न झालेले काही असेल तर तो सी वर्ल्ड प्रकल्प आहे. महत्त्वाकांक्षी सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला असला तरी आचारसंहितेनंतरच्या सहा महिन्यात सी-वर्ल्ड मार्गी लावला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चिपी येथे दिली. 

चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय वाणिज्य, हवाई, उद्योगमंत्री सुरेश प्रभू, उमा प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, मत्स्योद्योगमंत्री महादेव जानकर, खासदार नारायण राणे, विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, अप्पर मुख्य सचिव सतीश गवई, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगण आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांच्या हस्ते आज असंघटित कामगारांसाठी वयाच्या साठाव्या वर्षी तीन हजार रुपयांची पेन्शन या योजनेचे लोकार्पण होत आहे. या योजनेमध्ये सर्वाधिक अडीच लाख लाभार्थी हे राज्यातील आहे. या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. चिपी विमानतळाच्या निमित्ताने नारायण राणे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आणि त्याला पूर्ण पाठिंबा मी दिला आहे. त्यामुळे आता या संपूर्ण विकासाच्या गाड्याला हा असा मंच आहे तो कोणीही थांबवू शकत नाही.

गेल्या साडे चार वर्षात या सिंधुदुर्गात विविध विकासाची जी कामे केली त्यातून येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. २०१४ मध्ये जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न हे ७१ हजार होते. ते आता १ लाख ४० हजार एवढे दुप्पट झाले आहे. गेल्या साडे चार वर्षात जी विविध विकासकामे झाली त्यामुळे या दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आज महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गामुळे येथील परिस्थिती बदलणार आहे. हे विमानतळ असेल, चांदा ते बांदा योजना असेल शिवाय आनंदवाडी प्रकल्पाचे काम असेल. मत्स्योद्योगमंत्री म्हणून जानकर यांनी आपल्या खात्याला गती दिली. फिशिंग हार्बरमध्ये वाढ करण्यात येत असून मत्स्योद्योगात मोठी भरारी घेतली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

फडणवीस म्हणाले, देशात पहिल्यांदा स्वतंत्र मत्स्य खाते मोदींनी तयार केले. शेतकर्‍यांना प्रमाणे मत्स्य शेतीला २ ते ४ टक्के कर्ज देण्याचा निर्णय मोदींनी घेतला. यातून मासेमारी व्यवसाय करणार्‍यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम केले आहे. विमानसेवा लवकर सुरू झाल्यास विकासाचे चित्र पाहायला मिळेल. विमानतळामुळे विकासाची गती तीनपटीने वाढलेली दिसून येईल. विविध अडचणींवर मात करून प्रभू व पालकमंत्री केसरकर यांच्यासह अन्य लोकांनी परवानग्या आणल्या.

येत्या काळात अल्टरनेट विमानतळ हे होईल. जवळच खाडी आहे या खाडीत जेटी बांधल्यास उत्तर गोव्यात वाहतूक होईल. यामुळे या विमानतळाचे महत्त्व वाढेल. या भागात प्रदूषण मुक्त उद्योग आले पाहिजेत. यासाठी उद्योग विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत असेही फडणवीस म्हणाले.  

एमआयडीसी अडथळे दूर करून येथे उद्योग आणले पाहिजेत. या उद्योगांबरोबर ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार मिळायला पाहिजे यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. जे स्वप्न या जिल्ह्यासाठी पाहिले. त्यात पर्यटन, मत्स्यपालन या दोन माध्यमातून रोजगाराची निर्मिती करत आहोत. केंद्राच्या माध्यमातून नवीन प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल. सी वर्ल्ड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला उशीर झाला. वेगळ्या पद्धतीने हा प्रकल्प करूया. स्विस चॅलेंजमधून प्रस्ताव घेत सी-वर्ल्ड प्रकल्प आचारसंहितेनंतरच्या सहा महिन्यात मार्गी लावला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis comment