नाणार रिफायनरीबाबत फेरविचार करणार - मुख्यमंत्री

नाणार रिफायनरीबाबत फेरविचार करणार - मुख्यमंत्री

राजापूर - नाणार रिफायनरी प्रकल्पाला झालेल्या विरोधामुळे तो थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रकल्पाला असलेले समर्थन पाहून, रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी झालीच पाहिजे, अशी एकच जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे राज्यभर महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज सायंकाळी राजापुरात आली. त्यानिमित्त येथील एसटी डेपोसमोर झालेल्या जाहीर सभेत श्री. फडणवीस यांनी राजापूरकरांशी रिफायनरीच्या अनुषंगाने संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नाणार रिफायनरी प्रकल्पाला असलेल्या समर्थनाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जावे, यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली नाणारवासीयांनी रिफायनरी समर्थनाचे फलक घेऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मग तोच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची ग्वाही दिली. 

मी वारंवार सांगत होतो, की नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिजे. ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे. यातून एक लाख तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे कोकणचा कायापालट होणार आहे. मात्र या प्रकल्पाला ज्या प्रकारे विरोध झाला, त्यामुळे आम्ही तो थांबविला. मात्र आजचा तुमचा उत्साह पाहिल्यानंतर आता याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. मी आता याठिकाणी कोणताही निर्णय जाहीर करत नसलो, तरी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, यासाठी लवकरच चर्चा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

राजापुरात मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचे तालुका भाजपतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार जठार, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, माजी तालुकाध्यक्ष अनिलकुमार करगुंटकर, भाजप नेते प्रसाद पाटोळे आदी उपस्थित होते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com