मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा युतीला तडे देणारा 

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा युतीला तडे देणारा 

सावंतवाडी - शिवसेनेचा तीव्र विरोध असलेल्या नाणार प्रकल्पाचे समर्थन, जाहीर सभांमध्ये महायुतीत शिवसेनेचा टाळलेला उल्लेख, शिवसेनेच्या माजी आमदार सूर्यकांत दळवींना दिलेली भेट आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी भाजप प्रवेशाबाबत केलेला ठोस दावा यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा युतीला तडे देणारा ठरण्याची चिन्हे आहेत. 

भाजपची महाजनादेश यात्रा मंगळवारी (ता. 17) सिंधुदुर्ग, रत्नागिरीत आली. मुख्यमंत्र्यांच्या या सभेसाठी भाजपने जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले. युतीच्या जागावाटपातील कणकवली आणि रत्नागिरी या भाजपच्या पारंपरिक जागा असलेल्याच ठिकाणी या सभा झाल्या. यात शिवसेनेला थेट अंगावर ओढवून घेणारी टीका टाळली; मात्र पूर्ण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच "फोकस' ठेवला गेला. सध्या युती होणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता आहे. यातच कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. यामुळे युतीबाबतच्या अंतर्गत घडामोडींच्या दृष्टीने मात्र हा दौरा बोलका ठरला. 

कणकवली आणि रत्नागिरीतील सभेत मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांकडे जनाधार मागताना भाजप महायुती असे वक्‍तव्य करत शिवसेनेचा उल्लेख टाळला. युतीबाबतही कोणतेच जाहीर वक्‍तव्य केले नाही. कणकवलीतील सभेआधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. यानंतर राणेंनी आपला भाजप प्रवेश निश्‍चित असल्याचा ठोस दावा केला. राणे आणि शिवसेनेचे राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे. त्यांचा हा दावा शिवसेना नेत्यांच्या युतीबाबत भुवया उंचावणारा ठरला. 

राजापूर तालुक्‍यात होऊ घातलेल्या नाणार रिफायनरीला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. लोकसभेत या दोन्ही पक्षांची युती होण्यामध्ये नाणार रद्द करणे ही मुख्य अट होती; मात्र याच राजकीयदृष्ट्या कळीच्या मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी हात घातला. राजापुरात कार्यकर्त्यांशी जाहीररीत्या बोलताना नाणारचा पुनर्विचार करण्याचे संकेत त्यांनी दिले. तोलून-मापून बोलणाऱ्या फडणवीस यांचे हे वक्‍तव्य युतीच्या भवितव्याबाबत काहीसे प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे म्हणावे लागेल. 

शिवसेनेकडून पाचवेळा आमदार झालेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेटही बोलकी आहे. युती न झाल्यास भाजपकडून दापोलीसाठीची ही चाचपणी मानली जात आहे. गेल्यावेळी श्री. दळवी तेथून पराभूत झाले होते. आता तेथून शिवसेनेतर्फे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश यांना उमेदवारीची शक्‍यता आहे. एकूणच हा दौरा युतीबाबतच्या शक्‍यतेला काहीसे तडे देणारा आहे. या दौऱ्यानिमित्त झालेले शक्‍तिप्रदर्शन पाहता निवडणुकीत भाजप कोकणात जोरदार ताकद लावणार असल्याचे संकेतही यातून मिळाले आहेत. 

युतीचे भवितव्य ठरवणार रणनीती? 
2014 च्या निवडणुकीतही लोकसभेसाठी युती आणि विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला गेला. पाच वर्षांत सत्तेत असूनही शिवसेनेने विरोधाची भूमिका घेतली. काँग्रेस आघाडीचे महत्त्व कमी करण्याची ही रणनीती असल्याचे मानले जाते. आताही युती झाली, तर थेट स्पर्धा आघाडीशी असणार आहे. याऐवजी शिवसेना, भाजप एकमेकांविरोधात लढल्यास बऱ्याच मतदारसंघात या दोघांतच स्पर्धा होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीनंतर युतीचा पर्यायही खुला राहणार आहे. यामुळे युती करणे किंवा तोडणे हा या दोन्ही पक्षांच्या रणनीतीचा भाग असेल, असे राजकीय विश्‍लेषकांना वाटते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com