सिंधुदुर्गात 453 तीव्र कमी वजनाची मुले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुलांमध्ये रक्ताशय प्रमाणात झालेली वाढ चिंताजनक 
जिल्ह्यातील मुलांमध्ये रक्ताशयाचे प्रमाण वाढत असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 ते 19 वयोगटातील जिल्ह्यातील 1 लाख 72 हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जेथे निवडणूक कामासाठी शिक्षक प्रशिक्षणात गुंतले आहेत, अशा शाळेतील विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.

सिंधुदुर्गनगरी - कुपोषणमुक्त सिंधुदुर्गाचे स्वप्न अद्याप कोसो दूर असल्याचे आजच्या महिला बालकल्याण समिती सभेत स्पष्ट झाले. इतकी वर्षे प्रयत्न करूनही अद्याप जिल्ह्यात 453 इतकी तीव्र कमी वजनाची मुले असल्याचे स्पष्ट झाले. यावर ठोस उपाय योजण्यासाठी मर्यादाही या वेळी उघड झाल्या. 

स्वच्छ जिल्हा, शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर जिल्हा, तंटामुक्त जिल्हा, पर्यावरण संतुलित जिल्हा अशी कितीतरी स्वप्नं गेल्या 8-10 वर्षांत पाहिली गेली. त्यातील काही प्रत्यक्षातही उतरली; मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही कुपोषणमुक्त जिल्ह्याचे स्वप्न साकारताना दिसत नाही. याचाच प्रत्यय आजच्या सभेत आला. 

जिल्ह्यात कुपोषणमुक्तीसाठी गेली कित्येक वर्षे महिला व बालविकास विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. यावरील उपाययोजनेवर दरवर्षी लाखो रुपये निधी खर्च केला जात आहे. तरीही अद्याप जिल्ह्यात 453 एवढी मुले तीव्र कमी वजनाची मुले आजच्या आढाव्यात उघड झाले. मात्र या कमी वजनाच्या 453 मुलांवरील उपाययोजनाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही किंवा त्या मुलांची सद्य:स्थिती काय, याबाबतही सभेत आढावा घेण्यात आला नाही. त्यामुळे महिला व बालविकास विभाग आणि समिती सदस्यांचे कुपोषणमुक्तीचे प्रयत्न थंडावले की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

जिल्ह्यातील तरुण मुलांमध्ये रक्ताशयाचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उद्या (ता. 10) जिल्ह्यातील 1 ते 19 वयोगटातील 1 लाख 72 हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. या वेळी समिती सचिव तथा महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, समिती सदस्य वंदना किनळेकर, श्रावणी नाईक, निकिता तानावडे, कल्पिता मुंज यांच्यासह खातेप्रमुख, तालुका प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. 

आजच्या सभेत गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीचा आढावा घेण्यात आला. देण्यात येणाऱ्या विविध लाभाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये वैभववाडी तालुक्‍याचे अंगणवाडी मुलांच्या आरोग्य तपासणीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे दिसून आले. आतापर्यंत वैभववाडी तालुक्‍यातील 100 पैकी केवळ 30 अंगणवाड्यातील मुलांची आरोग्य तपासणी झाली असल्याचे उघड झाले. यावर सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्यासह सर्वच सदस्यांनी वैभववाडी तालुका अंगणवाडी आरोग्य तपासणीत मागे का, असा प्रश्‍न उपस्थित करत उर्वरित तपासणी केव्हा पूर्ण होणार? ती अद्याप का केली नाही? अशी विचारणा केली. या वेळी वैभववाडीला वाहन उपलब्ध नसल्याने मुलांच्या आरोग्य तपासणीचे काम जलदगतीने होत नसल्याचे समोर आले. यावर सभापती वळंजू यांनी मुलांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य द्या, आरोग्य विभागाने वाहन उपलब्ध करून द्यावे. मार्चपूर्वी सर्व अंगणवाड्यांची तपासणी झाली पाहिजे, असे आदेश दिले. 

मुलांमध्ये रक्ताशय प्रमाणात झालेली वाढ चिंताजनक 
जिल्ह्यातील मुलांमध्ये रक्ताशयाचे प्रमाण वाढत असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 ते 19 वयोगटातील जिल्ह्यातील 1 लाख 72 हजार मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जेथे निवडणूक कामासाठी शिक्षक प्रशिक्षणात गुंतले आहेत, अशा शाळेतील विद्यार्थ्यांना 15 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत. याबाबतचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सभेत दिली.

Web Title: children health issue in sindhudurg