मुलांची शबय बॅंक झाली "लाख' मोलाची 

प्रभाकर धुरी
शनिवार, 22 एप्रिल 2017

दोडामार्ग - कधी पहिली-दुसरीत शिकणाऱ्या मुलांनी लाखो रुपयांची बचत खाऊच्या पैशातून केली असे सांगितले तर विश्‍वास बसणार नाही, खरंच ना? पण यावर विश्‍वास ठेवावाच लागेल. कारण ती कपोलकल्पित कथा नाही तर दोडामार्ग तालुक्‍यातील पणतुर्ली प्राथमिक साळेतील चिमुकल्या मुलांची प्रेरणादायी आणि वास्तव कथा आहे. "शबय बॅंक' या नावाने शाळेतच सुरू झालेली बॅंक आज "लाखमोलाची' झाली आहे. 

दोडामार्ग - कधी पहिली-दुसरीत शिकणाऱ्या मुलांनी लाखो रुपयांची बचत खाऊच्या पैशातून केली असे सांगितले तर विश्‍वास बसणार नाही, खरंच ना? पण यावर विश्‍वास ठेवावाच लागेल. कारण ती कपोलकल्पित कथा नाही तर दोडामार्ग तालुक्‍यातील पणतुर्ली प्राथमिक साळेतील चिमुकल्या मुलांची प्रेरणादायी आणि वास्तव कथा आहे. "शबय बॅंक' या नावाने शाळेतच सुरू झालेली बॅंक आज "लाखमोलाची' झाली आहे. 

पणतुर्ली छोटस सर्वसामान्य शेतकरी कुटुंबीयांचे गाव. गावात चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. कधी गावात पाहुणे आले की मुलांच्या हातात खाऊसाठी पैसे पडतात, कधी एखाद्या स्पर्धेत यश मिळाले की मुलांचे रोख रकमेने कौतुक केले जाते. कधी आई, बाबा नाहीतर दादा, ताई मायेने रुपया, दोन रुपये देतात असा सारा आर्थिक मामला. हातात पैसे आले की मुलांची पावले दुकानाकडे वळतात. चणे शेंगदाणे, चॉकलेट, कुरकुरे खायचे आणि पैसे "गट्टम' करायचे अशी त्यांची सवय. पण 2014 सालात दिगंबर तळणकर शिक्षक म्हणून तेथे रुजू झाले आणि सारे चित्रच पालटले. 

2014 च्या शिमगोत्सवात "शबय'च्या पैशांची चर्चा वर्गात सुरू होती. मला इतके मिळाले, तुला किती मिळाले वगैरे वगैरे. ती चर्चा ऐकून तळणकर गुरुजींनी मुलांना त्या पैशाचे काय करणार असा प्रश्‍न विचारला. एका दमात मुलांनी त्या पैशाचा खाऊ खाणार म्हणून जाहीर करून टाकले. पण श्री. तळणकर यांनी त्यांना समजावले. बचतीचे महत्त्व पटवून दिले. मुले तयार झाली. अगदी पन्नास पैशापासून पैसे जमा व्हायला लागले. "शबय'च्या पैशातून सुरू झालेली बॅंक म्हणून तिला "शबय बॅंक' असे नाव पडले. गुरुजींनी शाळेतच पासबुके तयार केली. पालकांचा विश्‍वास बसावा म्हणून त्यांच्या सह्या घेण्यास सुरवात केली. हळूहळू रक्कम वाढली. तेवढ्यातच जिल्हा बॅंकेची मुलांसाठी बचत योजना आली. दहा वर्षात दुपटीहून अधिक रक्कम मिळण्याचा मार्ग मिळाला. शाळेत जमलेले पैसे मुलांच्या बॅंक खात्यात जमा व्हायला लागले. मुलांच्या नावे "फिक्‍स डिपॉझिट' ठेवण्यात आली. चिल्लर पैशांची बॅंक लाखमोलाची झाली. शबयमध्ये जमलेल्या पैशाने बचतीचा मंत्र दिला. श्री. तळणकर व लक्ष्मण पाटील या शिक्षकांनी कल्पनेला मूर्तरूप दिले. मुलांना बचतीचा आनंद तर पालकांना मुलांचा अभिमान वाटला. "इतके पैसे मुले खाऊसाठी खर्च करणार होती का' असा अनाहूत प्रश्‍नही पालकांच्या तोंडून आला. पणतुर्ली शाळेतील छोट्या मुलांमध्ये त्यातून वेगळा आत्मविश्‍वासही आला. 

शिक्षकांनी सांगितले मुलांनी ऐकले 
शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते शब्दापलीकडे असते. मुलांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. विद्यार्थीही आज्ञाधारक आणि शिक्षकप्रिय असला की त्याचे आयुष्य बदलण्यास वेळ लागत नाही. पणतुर्ली शाळेतील विद्यार्थ्यांनी अन्य शाळेतील विद्यार्थ्यांना बचतीच्या सवयीमधून खूप मोठी प्रेरणा दिली आहे. 

Web Title: Children's Bank