गुगल मॅपमुळे चिनी पर्यटक जंगलात भरकटला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

गुगल मॅपद्वारे अनेक जण नवीन ठिकाणाचा मार्ग शोधतात. मात्र, या गुगल मॅपमुळे चक्क एक चिनी पर्यटक भरकटल्याची घटना समोर आली आहे.

पाली - गुगल मॅपद्वारे अनेक जण नवीन ठिकाणाचा मार्ग शोधतात. मात्र, या गुगल मॅपमुळे चक्क एक चिनी पर्यटक भरकटल्याची घटना समोर आली आहे. चीनमधून इफन सिंघराजा हा पर्यटक मंगळवारी (ता. 15) सुधागड तालुक्‍यातील ठाणाळे येथील प्रसिद्ध लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी आला होता. तो गुगल मॅपच्या साहाय्याने ठाणाळे जंगल परिसरात गेला. मात्र, या गुगल मॅपमुळे हा पर्यटक जंगलात भरकटला. 

वाट चुकलेल्या इफन सिंघराजाने अखेर आपल्या मित्रमंडळींना संपर्क करून आपण वाट चुकलो असल्याची माहिती दिली. मुंबईतील सहकारी मित्रांनी येथील शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या वेळी शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान सुधागडच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिकांनी तत्काळ त्या पर्यटकाची दुपारी 4 वाजताच्या दरम्यान शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, इफन लेण्यांच्या वरच्या जंगलात पोहचला होता. सायंकाळी 7.30 नंतर लेण्यांच्या वर कड्या कपारीत शोधकर्त्यांना इफन सापडला. या वेळी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना पाहून इफनने सुटकेचा निश्‍वास सोडला. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी इफनला जंगलातून सुखरूप बाहेर काढले व ठाणाळे लेण्यांच्या पायथ्याशी आणले. त्यानंतर रात्री साडे दहा वाजता सर्वजण ठाणाळे गावात पोहचले. 

लग्नसमारंभासाठी इफन भारतात 
दरम्यान, इफन सिंघराजा याने शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. या वेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुजित बारसकर, पोलिस पाटील संजय बारसकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष अनिल वारंगे, ग्रामस्थ विजय वारंगे, राजेश खाडे आदी उपस्थित होते. इफन हा उत्तराखंड येथे एका लग्नासाठी आला आहे. हे लग्न पुढच्या महिन्यात असल्याने तोपर्यंत तो भारतात विविध ठिकाणी फिरत आहे. 

अशा अनोळखी ठिकाणी व जंगल परिसरात जाताना स्थानिक लोकांना सोबत घ्यावे किंवा संपूर्ण परिसराची नीट माहिती करून घ्यावी. केवळ तंत्रज्ञानावरच अवलंबून राहू नये, नाहीतर मोठा बाका प्रसंग ओढवू शकतो. प्रत्येकाने ही खबरदारी आवश्‍य घ्यावी. 
सुजित बारसकर, कार्याध्यक्ष, शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठान, सुधागड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese Tourist misguided by google map