चिपळूणला घरोघरी कोविड टेस्टिंग ट्रेसिंगला सुरवात

नागेश पाटील
Sunday, 19 July 2020

कॉंग्रेसने केलेल्या मागणीला प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद दिला असून शहरात प्रभागनिहाय घरोघरी कोविड टेस्टिंग ट्रेसिंगला सुरवात झाली आहे.

चिपळूण : कॉंग्रेसने केलेल्या मागणीला प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद दिला असून शहरात प्रभागनिहाय घरोघरी कोविड टेस्टिंग ट्रेसिंगला सुरवात झाली आहे. पालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून थर्मल स्क्रिनिंग तसेच ऑक्‍सिमिटरच्या साह्याने तपासणी केली जात आहे. 

जिल्ह्यात प्रथमच चिपळूण शहरात हा प्रयोग केला जात असून चिपळूण शहर कॉंग्रेसच्या मागणीला या निमित्ताने यश आले आहे. त्यामुळे शहराध्यक्ष लियाकत शहा यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. 
शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज दुहेरी संख्येत रुग्ण सापडत आहेत. घरडा कंपनीतून सुरू झालेली कोरोना संक्रमण साखळी शहरात वेगाने पसरताना दिसत आहे. यामुळे शहर कॉंग्रेसने शहरात धारावी पॅटर्न राबवण्याची मागणी केली होती.

काही दिवसांपूर्वी शहराध्यक्ष लियाकत शहा व पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांची भेट घेऊन चिपळूण शहरात प्रत्येक घरात कोविड टेस्टिंग ट्रेसिंग उपक्रम राबवा आणि अलगीकरण तसेच विलगीकरण अशा उपाययोजना राबवून तातडीने बाधितांवर उपचार करावेत. प्रशासनाने नियोजन करावे. जेणेकरून शहरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल. गणपती सणापूर्वी कोरोनाचे समूळ उच्चाटन होईल, अशी मागणी करून तसे निवेदन कॉंग्रेसने दिले होते. 

या मागणीला प्रशासनाने तत्काळ प्रतिसाद दिला. शहरात शुक्रवारपासून प्रभागनिहाय आरोग्य पथक नियुक्त करून थर्मल स्क्रिनिंग तसेच ऑक्‍सिमीटरच्या साहाय्याने ऑक्‍सिजनची मात्रा तपासण्याचे काम हाती घेण्यात आले. प्रत्येक नागरिकांची माहिती, त्यांचा प्रवास इतिहास, संपर्काची माहिती आणि सर्दी, खोकला, ताप अशा लक्षणांची माहितीदेखील घेतली जात आहे. चिपळूण पालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून प्रत्येक घरात जाऊन ही तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. नागरिकदेखील त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chiplun begins covid testing at home