प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेवर ग्रामसेवकांचा बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

चिपळूण - प्रजासत्ताकदिनी (ता. २६) होणाऱ्या ग्रामसभेवर राज्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला आहे. प्रामुख्याने प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामसेवकांना वेठीस धरून मारहाणीचे प्रकार घडतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाची ग्रामसभा अन्य दिवशी असावी, अशी मागणी संघटनेतर्फे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सचिव असणारे ग्रामसेवक ग्रामसभेस अनुपस्थित राहणार असून सरपंचांना ग्रामसभेला सचिव नेमावा लागणार आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींनी प्रजासत्ताकदिनी ग्रामसभा घेण्याचा शासन निर्णय आहे. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेस ग्रामसेवकांना वेठीस धरून मारहाणीच्या घटना राज्यभरात घडल्या आहेत. राजकारणातील रोष ग्रामसेवकांवर व्यक्त करून ग्रामसेवकांनाच टार्गेट केले जाते. ग्रामपंचायतीत मासिक सभा, ग्रामसभा, महिला सभा, प्रभाग सभाही घेतल्या जातात. त्याचे लेखापरीक्षणही होते. प्रजासत्ताक हा राष्ट्रीय सण असून त्याचा आनंद घेणे प्रत्येक देशवासीयांचा हक्क आहे. यासाठी शासनाकडून सुट्टी जाहीर केली जाते.

प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ध्वजवंदन कार्यक्रमाला ग्रामसेवक उपस्थित राहतील. मात्र ग्रामसभेस हजेरी लावणार नाहीत. याबाबत सर्व सरपंचांना ग्रामसेवकांनी लेखी पत्र देत अनुपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सरपंच अथवा ग्रामसभेस संयुक्त चर्चेद्वारे सचिवाची नेमणूक करावी लागणार आहे.

प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामसेवकांना मारहाण होण्याच्या घटना राज्यभरात वारंवार घडल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाची ग्रामसभा इतर दिवशी घेतली जाईल. त्यास ग्रामसेवक संघटनेचा विरोध नाही. प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेबाबतची संघटनेची भूमिका गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच ग्रामविकास सचिवांकडे मांडण्यात आली आहे.
- अनिल शिंदे, जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक संघटना

Web Title: chiplun konkan news gramsevak boycott on gramsabha