केटामाईन तपासात पोलिसांची भूमिका संशयास्पद - जयंद्रथ खताते

केटामाईन तपासात पोलिसांची भूमिका संशयास्पद - जयंद्रथ खताते

चिपळूण - केटामाईन तस्करी प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासात कंपनी व्यवस्थापनाचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. तस्करी प्रकरणात सामान्य कामगारांनाच गोवले जाते. यातील मोठे मासे पोलिसांच्या जाळ्यात सापडलेले नाहीत. संबंधित तपासयंत्रणा संशयास्पद पद्धतीने तपास करीत असून आम्ही त्याचा निषेध करीत आहोत. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा  बुधवारी (ता. २८) लोटे एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

खताते म्हणाले की, दोन वर्षापूर्वी पोलिसांनी केटामाईन तस्करी करणाऱ्यांना पकडले होते. खेड तालुक्‍यातील लोटे येथील सुप्रिया लाईफ सायन्समधून केटामाईन बाहेर पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. कारवाईवेळी केटामाईनची किंमत ४ कोटी असल्याचे जाहीर झाले. काही कालावधीनंतर त्याची किंमत १० लाख रुपये दाखवण्यात आली. झालेली तस्करी उघड झाल्यानंतरही कंपनीने कोणतीही दक्षता घेतली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा केटामाईनची तस्करी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. केटामाईन तस्करी करणारे सामान्य लोक, कामगार सापडत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केलेला नाही. प्राथमिक तपासात त्यांनी कंपनी मालक व व्यवस्थापनाचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. तपास यंत्रणेने चार दिवसाच्या तपासात संबंधितांना क्‍लीन चीट देणे संशयास्पद आहे. 

मुख्य सूत्रधार सामान्य कामगारांचा बळी देत आहेत. तस्करीतील बड्या माशांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. पहिल्या टप्प्यात सापडलेल्या संशयींतापलीकडे तपास जात नाही. वास्तविक कंपनीतून होणारी चोरी उघड झाल्यानंतर त्याबाबत दक्षता घेण्याची आवश्‍यकता होती. ती घेतली नसल्यानेच कंपनीबाबत समाजात संशय निर्माण झाला आहे. अशा तस्करीतून तरुण पिढी बरबाद होत आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चा काढणार आहे.

केटामाईन चोरीतून शहाणपण शिकणार का?
लोटे - लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीमध्ये केटामाईन या अमली पदार्थाचा वापर होतो व ते तेथे मिळू शकते. एवढेच नव्हे तर तेथून ते बाहेरही नेता येते, हे केटामाईनच्या चोरी प्रकरणातून पुन्हा उघड झाले. 

याआधी असा प्रकार होऊनही कंपनी शहाणपण शिकली नाही. 
लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये दोनशे पन्नास कंपन्या कार्यरत आहेत. यापैकी कोणत्या कंपन्या अमली पदार्थाचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात, याचीही चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी केली जात आहे. दोनशे पन्नास कंपन्यांपैकी अनेक कारखान्यांच्या गेटसमोर नामफलकच नाही, मात्र हे कारखाने सुरू आहेत की नाही याचीही चौकशी करणे आवश्‍यक आहे. कारण नावाचा फलक अनिवार्य आहे. काही कारखान्याच्या गेटला कायमस्वरूपी टाळे लावलेले भासते. मात्र आतमध्ये उत्पादन सुरू असते, असे काही वेळा निदर्शनास येते. याचीही चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी केली जात आहे.

लोटे वसाहतीत व्हीव्हीसी फार्माशी संबंधीत पुरीनामक उद्योजक केटामाईन उत्पादनामध्ये पकडले गेले आहेत. गेली अनेक वर्षं ही कंपनी बंद आहे. अजूनही व्हीव्हीसी फार्मा कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर केटामाईन असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ते कोणाच्या हाती लागले तर अनेक तरुण नशेमध्ये उद्‌ध्वस्त होतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. 

हा सामाजिक धोका लक्षात घेवून पोलिसांनी केटामाईन प्रकरणाची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी येथील पुढारी मंडळी व नागरिक गेली दोन वर्षे सातत्याने करीत आहेत. काही वर्षापूर्वी लोटे वसाहतीतील  एक नामांकित कंपनी नाफ्ता तयार करून ते पेट्रोलमध्ये भेसळ करण्यासाठी पेट्रोल मालकांना विकत असे. पोलिसांनी कारवाई करत या कंपनीचा पर्दाफाश केला होता. लोटे वसाहतीमध्ये अशा प्रकारांसह केटामाईन सहजपणे चोरून नेता येईल, सहा-सहा पहारेकरी असूनही चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला तपासणी न करता सोडले जाते, याचे गौडबंगाल काय, याचाही पर्दाफाश होणे आवश्‍यक आहे. त्याआधीच क्‍लिनचिट देण्याची घाई तपास यंत्रणेला का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com