संशयित ईसा हळदे याला सहा दिवसांची कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

रक्तचंदन तस्करी प्रकरणातील संशयित आरोपी हळदे याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. तो रक्तचंदन कोठे पाठवत होता, या तस्करीमध्ये अन्य कोण सहभागी आहेत, याबाबत त्याच्याकडे चौकशी केली जाणार आहे.
- विकास जगताप, विभागीय वनाधिकारी, रत्नागिरी (चिपळूण)

चिपळूण - रक्तचंदनाच्या तस्करीमधील संशयित ईसा हळदे वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. पोलादपूर येथे आज (ता. 30) पहाटे पाच वाजता विभागीय वनाधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख व सहकाऱ्यांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

चिपळूण शहर व गोवळकोट परिसरात वनविभागाच्या पथकाने 30 डिसेंबर 2016 व 7 जानेवारी 2017 ला छापे टाकून 13.930 टन रक्तचंदन पकडले होते. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 21 कोटी रुपये आहे. या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून गोवळकोट येथील ईसा हळदे याच्यावर गुन्हा नोंदविला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हळदे चिपळूणमधून पसार झाला होता. पोलिस व वनविभागाचे कर्मचारी त्याच्या मागावर होते. अटक टाळण्यासाठी त्याने उच्च न्यायालयाचेही दार ठोठावले होते; मात्र न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला. वनविभागाने त्याच्या नातेवाइकांवर लक्ष ठेवले होते.

त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे तो येणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार परिक्षेत्र वनाधिकारी निलख, सावर्डेचे वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक उमेश आखाडे, रामदास खोत, आर. पी. बंबर्गेकर यांनी पोलिसांच्या सहकार्याने पोलादपूर बस स्थानकावर सापळा रचला होता. पहाटे पाच वाजता तो पोलादपूर बस स्थानकावरील पिकअप शेडमध्ये जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.

Web Title: chiplun konkan news suspected isa halade police custody