चिपळुणात विरोधही नाही, समर्थनही नाही

पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज
Shivsena
Shivsenasakal

चिपळूण गेल्या आठ दिवसांपासून राज्यात शिवसेनेतील बंडाळी राजकीय सारीपाटावर चर्चेचा केंद्रबिंदू झाली; मात्र चिपळूणमधील वातावरण सामसूम आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या विरोधात निदर्शने तर नाहीच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी कुणी फलकही लावलेले नाही. त्यामुळे चिपळूणशी शिवसेना अजूनही फ्लॅटमोडवर असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात माजी नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडाचे निशाण रोवले होते. या बंडाळी विरोधात संपूर्ण राज्यात शिवसैनिक रस्त्यावर उतरून बंडखोरांविरोधात आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. आम्ही शिवसेनेबरोबर आहोत, असा ठराव पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर शिवसैनिक शांत झाले. खरंतर, पालिका निवडणूक समोर आहे. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडे ही मोठी संधी असताना शिवसेनेचे नेते मात्र अजूनही फ्लॅटमोडवर आहेत. अडीच वर्षांपूर्वी सेनेच्या उमेदवारांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्या पराभवाच्या मानसिकतेतून अजूनही सेनेचे पदाधिकारी बाहेर येण्यास तयार नाहीत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हेही बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. आमदार योगेश कदम यांच्यानंतर उदय सामंत यांच्या रूपाने जिल्ह्यातील दुसरा आमदार फुटला. शिवसेनेत आल्यापासून पक्षाने ज्यांना सतत लाल दिव्याची गाडी दिली, तेच फुटल्यानंतर त्याचे भांडवल करून कार्यकर्ते चार्ज करण्याची संधी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना आहे; मात्र या संधीचा फायदा कुणी उठवताना दिसत नाही.

निदर्शने न करण्यामागे कोणता अर्थ?

उदय सामंत यांचे रत्नागिरीनंतर सर्वाधिक लक्ष चिपळूणवर होते. आढावा बैठकांसाठी ते चिपळूणमध्ये यायचे, तेव्हा येथील स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागून फिरायचे. तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे सामंत यांच्या बंडानंतर शिवसेना कार्यकर्ते त्यांच्या विरोधात निदर्शने करत नाहीत. त्याला अनेक अर्थ आहेत; मात्र मुख्यमंत्री ठाकरेंच्या समर्थनासाठी साधे बॅनरही लागले नाहीत किंवा कार्यकर्ते एकत्र जमून घोषणाबाजी सुद्धा झाली नाही, त्याचे सर्वांनाच आश्चर्य आहे.

उदय सामंत यांनी शिवसेना सोडलेली नाही. मी अजूनही शिवसेनेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कार्यकर्ता आहे, असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ते पुन्हा येतील, असा विश्वास आहे.

- संदीप सावंत, चिपळूण तालुकाप्रमुख शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com