भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसची छोट्या पक्षांशी महाआघाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

चिपळूण - आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस इतर छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी ‘सकाळ’ला दिली. 

चिपळूण - आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस इतर छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महाआघाडी करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांनी ‘सकाळ’ला दिली. 

२०१४ पासून राज्यात भाजपचा प्रभाव वाढत चालला आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेत एकत्र असलेली शिवसेना आणि भाजप हे स्थानिक निवडणूका एकमेकांविरोधात लढवत आहेत. सत्तेतील दोन पक्षाच्या लढाईचा फटका विरोधी पक्षाला बसू लागला आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस आणि या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. हीच परिस्थिती राहिली तर दोन-अडीच वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा निभाव लागणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे ठरवल्याचे दलवाई यांनी सांगितले. राज्यात काँग्रेस बांधणीचा कार्यक्रम नव्याने सुरू झाला आहे. पक्षात तालुका आणि जिल्हास्तरावर काम करण्यासाठी अनेक नवे चेहरे पुढे येत आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी तयार होईल. नव्या दमाच्या चेहऱ्यांना पक्षसंघटनेत स्थान दिले जाईल. लोकशाही पद्धतीने संघटनात्मक निवडणुका घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड होईल. पक्षातील ५० टक्के पदे ही नव्या चेहऱ्यांना दिली जाणार आहेत. त्याचबरोबर देशपातळीवर इतर पक्षांबरोबर महाआघाडीची बोलणी सुरू आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची वादग्रस्त प्रकरणे बाहेर काढली. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करताना सामजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या निधीत कपात केली. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना या दोन्ही खात्याच्या निधीला कधीही कात्री लावली नव्हती. याची माहिती जनतेपर्यंत पोचवली जाणार असल्याचे खासदार दलवाई यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीसह आरपीआय, कवाडे गटाबाबत आशावादी
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्र आहे. मागील निवडणुकीत या पक्षाने स्वतंत्र भूमिका घेतली होती; मात्र त्याही पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न असल्यामुळे राष्ट्रवादीलाही आमच्याबरोबर येण्याचा विचार करावा लागणार आहे. आरपीआयचा एक गट, कवाडे गटही काँग्रेसबरोबर येईल अशी अपेक्षा आहे.

Web Title: chiplun news bjp congress Husain Dalwai