लोकसहभागातून उद्यानांची देखभाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

चिपळूण - शहरातील उद्यानांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा १५ लाखांचा खर्च वाचणार आहे. 

चिपळूण - शहरातील उद्यानांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा १५ लाखांचा खर्च वाचणार आहे. 

पालिकेच्या मालकीची सहा उद्याने आहेत. चिंच नाका येथील साने गुुरुजी उद्यान व पागनाका येथील उद्यानासह दोनच उद्याने मोठी आहेत. उर्वरित चारही उद्याने लहान आहेत. या सहा उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका एका खासगी एजन्सीला देण्यात आला आहे. वृक्षारोपण, वाढलेल्या झाडांची छाटणी करणे, उद्यानांमध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून त्यासाठी सुरक्षारक्षक नेमणे, तसेच उद्यानांची देखभाल करण्याचे काम त्या एजन्सीला देण्यात आले होते. प्रत्यक्षात ही कामे केवळ कागदावरच रंगवली जात होती. अनेक नगरसेवकांनी वारंवार सभागृहात तक्रारी केल्या होत्या. उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नसतात. खेळण्यांची संख्या फार कमी आहे. जी खेळणी आहेत, ती जुनी आणि तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती होत नाही.

कचरा उचलला जात नाही. वर्षाला पंधरा लाखांचा खर्च करूनसुद्धा उद्यानांमध्ये काहीच सुधारणा होत नसल्याची तक्रारी होती. लायन्स क्‍लबने शहरातील उद्याने विनामोबदला देखभाल दुरुस्तीसाठी मिळावी, अशी मागणी पालिकेकडे केली आहे. त्याचबरोबर आदर्श क्रीडा व सामाजिक प्रबोधिनी या संस्थांनी विविध प्रभागातील उद्याने लोकसहभागातून चालविण्यासाठी मिळावीत अशी मागणी केली आहे. मंगळवारी झालेल्या पालिकेच्या सभेत शहरातील दोन उद्याने आदर्श क्रीडा व सामाजिक प्रबोधिनी या संस्थेला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबरपासून ही उद्याने संस्थेला देखभाल दुरुस्तीसाठी दिली जाणार आहेत. संस्थेने उद्याने ताब्यात घेण्यापूर्वी ती सुस्थितीत असणे गरजेचे आहे, अशी सूचना शिवसेनेचे गटनेते शशिकांत मोदी यांनी मांडली. त्याला नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शहरातील नवतरुण मंडळानेही उद्याने लोकसहभागातून चालविण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पालिकेचा दरवर्षी उद्यान देखभाल दुरुस्तीवर होणारा १५ लाखांचा खर्च वाचणार आहे.

Web Title: chiplun news garden people's participation