एसटीची वायफायची नुसती जाहिरातबाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

चिपळूण - एसटी बसमध्ये प्रवाशांना वायफाय सेवा मिळत नाही. त्यामुळे वायफाय सुरू असल्याचे एसटीमध्ये लावलेले जाहिरातींचे फलक फसवे असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसमध्ये ग्राहकांना मोफत वायफाय सेवा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. त्यानंतर अनेक गाड्यांमध्ये वायफाय सेवा असलेली बस असल्याचे फलक लावण्यात आले. वायफायचे इन्स्ट्रूमेंट बसवण्यात आले. परंतु, प्रवाशांना वायफाय सेवा मिळत नाही. 

यापूर्वी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीने मोठा गाजावाज करीत कॉईन बॉक्‍स एसटीमध्ये बसविले होते. मात्र, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे कॉईन बॉक्‍सला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ते बॉक्‍स काढून टाकण्यात आले. सध्या वायफायचे युग असल्यामुळे बसेसमध्ये वायफायची इन्स्ट्रुमेंट लावून प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनोरंजन, मस्ती और धमाल, आपका मोबाईल आपका थिएटर अशा जाहिराती सुरू आहेत. 

वायफाय नेटवर्क आपल्या मोबाईलमध्ये कसे कार्यान्वित करावे, यासाठी सूचना फलकही लावण्यात आले. त्यामध्ये आरामात बसा व चित्रपट आणि कार्यक्रमांचा आनंद आपल्या मोबाईलमध्ये लुटा, असे लिहिण्यात आले आहे. परंतु एसटीमध्ये वायफाय सेवाच मिळत नाही. चिपळुणातून पश्‍चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या बसमध्ये वायफाय सेवा मिळत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे. 

प्रवाशांनी स्टीकर फाडल्याने प्रश्‍न
ज्या बसमधील वायफायचे यंत्र चालत नाही, ते दुरुस्त करण्यासाठी संबंधित एजन्सीचा माणूस आठवड्यातून एकदा चिपळूण आगारात येतो. वायफायचे यंत्र दुरुस्त करतो. आमचे कर्मचारी यंत्र दुरुस्त झाल्याची खात्री करून घेतात. एखाद्या बसमध्ये ही यंत्रणा चालत नाही म्हणून बस थांबवून ठेवू शकत नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीमध्ये स्टीकर लावण्यात आले आहेत. अनेक प्रवासी मुद्दाम ते स्टीकर फाडतात. त्यावर काही तरी लिहितात. त्यामुळे वायफाय यंत्रणा कशी चालू करावी हे लोकांना समजत नाही. त्यातूनच काही प्रश्‍न उपस्थित होत आहेत. त्याचा निपटारा आम्ही करत आहोत, अशी माहिती चिपळूण आगारप्रमुख रमेश शिलेवंत यांनी दिली.

Web Title: chiplun news st bus MSRTC