तेजस एक्‍स्प्रेसमधील 24 प्रवाशांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

प्रवाशांना नाश्‍ता करण्यासाठी रेल्वेकडून ब्रेड, आमलेट व कटलेट देण्यात आले होते. रत्नागिरी रेल्वे स्थानक सोडल्यानंतर उलट्या होत असलेल्या प्रवाशांची संख्या वाढू लागली. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना त्रास सुरू झाल्याने रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली

चिपळूण - कोकण लोहमार्गावरील गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या तेजस एक्‍स्प्रेसमधील 24 प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली. त्यामुळे "तेजस'ला चिपळुणात थांबवून सर्व बाधित रुग्णांना चिपळुणातील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. रेल्वे प्रशासनाकडून जखमींच्या नातेवाइकांना रेल्वे स्थानकाजवळच निवासाची सोय करण्यात आली. या प्रकारामुळे तेजस एक्‍स्प्रेस सुमारे दोन तास चिपळूण स्थानकावर उभी होती. या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

याबाबत घटनास्थळावरून आणि रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा-करमाळी येथून तेजस एक्‍स्प्रेस सकाळी 9 वाजता मुंबईकडे जाण्यास निघाली. आज दुपारी 12.30 वाजता ती रत्नागिरीत पोचली. रत्नागिरी स्थानकाआधी दोन प्रवाशांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांनी रेल्वेतील टीसींना त्रास होत असल्याची माहिती दिली. त्यानुसार टीसींनी चिपळूण रेल्वे स्थानकास माहिती देत आरोग्य सेवा तत्पर तयार ठेवण्याची सूचना केली. प्रवाशांना नाश्‍ता करण्यासाठी रेल्वेकडून ब्रेड, आमलेट व कटलेट देण्यात आले होते. रत्नागिरी रेल्वे स्थानक सोडल्यानंतर उलट्या होत असलेल्या प्रवाशांची संख्या वाढू लागली. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना त्रास सुरू झाल्याने रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली.

Web Title: chiplun news: tejas express poisoning