चिपळूण : वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय

वाहनचालक मिळेना; गाळ उठाव होईना
चिपळूण : वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय
sakal

चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीतील सुमारे ७ लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन केले होते; मात्र गाळ काढण्याच्या अखेरच्या टप्प्यात कामाची गती थंडावली आहे. सुरवातीला येथे आणलेली यंत्रणा अन्यत्र हलवण्यात आली आणि असलेली यंत्रणा चालक नसल्याने पडून आहे. मध्यंतरी डिझेल चोरीचा विषय उघडकीस आल्यावर कोणी चालक मिळेनासा झाला आहे. यांत्रिकी विभागाचे अधिकारीही कसोशीने चालक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ठप्प होत असलेल्या यंत्रणेला बूस्टर मिळण्यासाठी कोणी चालक देता का चालक, असे म्हणण्याची वेळ जलसंपदा पर्यायाने यांत्रिकी विभागावर आली आहे.

चिपळूण शहर पूरमुक्त होण्यासाठी एक पर्याय म्हणून वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. त्यासाठी चिपळूणवासीयांना तब्बल महिनाभर साखळी उपोषण छेडावे लागले. त्याचा परिपाक म्हणून जलसंपदा विभागाची राज्यातील सर्वात मोठी यंत्रणा चिपळुणात गाळ काढण्याच्या कामासाठी लागली होती. सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन होते. आतापर्यंत सुमारे सव्वाचार लाख घनमीटर गाळ उपसा करण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून येथे कार्यरत असलेली यंत्रणा अन्य जिल्ह्यांत गाळ काढण्याच्या कामासाठी स्थलांतरित करण्यात आली. त्याचाही कामाच्या

गतीवर परिणाम झाला. त्यातच गेल्या महिन्यात डिझेल चोरीचा घोटाळा उघडकीस आला. ज्या चालकांनी डिझेल रातोरात लंपास केले, त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. डिझेल चोरीच्या भानगडी उघड झाल्यावर चालकांची कमरता जाणवत आहे. टिपर चालकांना प्रति महिना सुमारे १४ ते १५ हजार अथवा प्रतिदिन ५०० रु. वेतन मिळते. हे वेतनही महिन्याकाठी वेळेत मिळत नाही. कंत्राटी स्वरूपात चालक घेतले जातात. डिझेल चोरीच्या घटना, त्यातच कोणीही येऊन चालकांना शिव्या देणे, दमदाटी करणे आणि काम नियमित नसल्याने येथे कोणी चालक येण्यास राजी होत नसल्याची स्थिती आहे.

सुमारे १२ ते १५ डंपर चालकांअभावी उभे

येथील गाळ काढण्याचे काम यापुढे १५ ते २० दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तेवढ्या दिवसाकरिता कोणी चालक मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सुमारे १२ ते १५ डंपर चालकांअभावी उभे आहेत. पावसाळ्यापूर्वी शेवटच्या टप्प्यात गाळ काढण्याच्या कामाची गती वाढायला हवी होती; मात्र सुरवातीची गती शेवटच्या टप्प्यात मंदावत गेली. परिणामी त्याचा गाळ काढण्याच्या कामावर परिणाम झाला आहे. नाम फाउंडेशनकडून शिवनदीतील संपूर्ण गाळ काढण्यात आला. परिणामी शिवनदीने आता मोकळा श्वास घेतला आहे.

मोफत गाळ नेण्याकडेही पाठ

वाशिष्ठी व शिवनदीतील काढलेला गाळ नागरिकांना मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला; मात्र पूरस्थिती भागात गाळ न टाकण्याची अट घातली. परिणामी याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील शासकीय व सार्वजनिक जागाही गाळाने भरल्या आहेत. शासकीय जागा शोधून तेथे गाळ टाकावा लागतो आहे.

जलसंपदाची आश्वासने हवेत

अखेरच्या टप्प्यात २४ तास काम सुरू ठेवण्याची हमी जलसंपदा विभागाचे कोकण विभाग मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दिली होती. पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात त्यांनी आढावा घेतानाच यंत्रणा वाढवण्याचे आश्वासन दिले होते; मात्र त्यांची ही आश्वासने हवेतच विरली आहेत.

एक नजर..

वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचा निर्णय

सुमारे ७ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन

डिझेल चोरीच्या भानगडी उघड झाल्यावर चालकांची कमतरता

टिपर चालकांना महिना १४ ते १५ हजार वा प्रतिदिन ५०० रु. वेतन

कंत्राटी चालक; हे वेतनही महिन्याकाठी वेळेत मिळत नाही

कोणीही येऊन चालकांना शिव्या देणे, दमदाटी करतात

काम अनियमित;चालक येण्यास राजी होत नसल्याची स्थिती

वाशिष्ठीतील गाळ उपसा;

मोहीम थंडावली,

डिझेल चोरीच्या विषयामुळे चालकांची पाठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com