सत्ता स्थापनेसाठी मुंबईत खलबते 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

राज्यात पंधरा वर्षे आघाडीचे सरकार असतानाही रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालिकेल्ला होता, यापुढेही राहील. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्तेमुळे जिल्ह्याला फार काही मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे हे यश जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे आहे. 
- प्रमोद नलावडे, शिवसैनिक, चिपळूण.

चिपळूण- जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी मुंबईतून हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सर्वच लोकप्रतिनिधी मुंबईत असल्याने, तेथे शक्‍य होईल तेव्हा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू आहे. शिवसेनेला मिळालेले यश आमदारांचे की मंत्र्यांचे, यावरून श्रेयवाद सुरू आहे. अधिवेशनादरम्यान एकत्र जमलेल्या सेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये या मुद्यावर चर्चा रंगत आहे. 

रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांत झाली. सत्तेवर असलेल्या भाजपने स्वबळावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली खरी; परंतु एकाही जागेवर भाजपला विजय मिळवता आले नाही. भाजप स्वबळावर लढल्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक नावापुरतीच तिरंगी झाली. जिल्हा परिषद आणि मुंबई महापालिकेसाठी एकाच दिवशी मतदान झाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपने शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले. सेनेला स्वबळावर मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची होती. त्यामुळे जिल्ह्याची जबाबदारी संभाळणारे सेनेचे मंत्री मुंबईत ठाण मांडून होते. 

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सेना उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सेनेच्या मंत्रांच्या किंवा वरिष्ठ नेत्यांच्या फारशा सभा झाल्या नाहीत. पालकमंत्री रवींद्र वायकर मुंबई पालिकेच्या निवडणुकीत गुंतले होते. केंद्रीय मंत्री अनंत गीते, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ठराविक ठिकाणी सभा घेतल्या. खासदार विनायक राऊत यांच्या जिल्ह्यात कॉर्नर सभा झाल्या. आमदार उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले उदय सामंत आणि राजन साळवी यांच्या मतदारसंघांत सेनेला सर्वाधिक यश मिळाले. सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चिपळुणात सेनेची ताकद वाढली. देवरूखमध्येही सेनेला चांगले यश मिळाले. जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली गुहागरमध्ये शिवसेनेला पहिल्यांदाच खाते उघडता आले. असे असले तरी "रत्नागिरी जिल्हा परिषदेची सत्ता मी आणली' असा दावा शिवसेनेचे मंत्री करत असल्यामुळे जिल्ह्यातील सेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे हे यश झाकोळले गेले आहे किंवा तसे जाणीवपूर्वक केले जात आहे. त्यातून सेना आमदारांमध्ये अंतर्गत कुरबूर सुरू झाली आहे. 
 

 

Web Title: Chiplun ZP decision pending