महाडमधील मुख्य मार्गावरील  मासळी बाजारामुळे नागरिक त्रस्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

महाड - महाड शहरातील प्रमुख व रहदारीच्या जिजामाता उद्यानासमोरील मार्गावर मासळी बाजार भरू लागला आहे. नो पार्किंग झोनमध्ये असलेल्या या भागात मासळी विक्रेत्यांनी पथारी पसरली आहे. नगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

महाड - महाड शहरातील प्रमुख व रहदारीच्या जिजामाता उद्यानासमोरील मार्गावर मासळी बाजार भरू लागला आहे. नो पार्किंग झोनमध्ये असलेल्या या भागात मासळी विक्रेत्यांनी पथारी पसरली आहे. नगरपालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

महाड शहरातील शिवाजी चौक परिसर वर्दळीचा व महत्त्वाचा भाग समजला जातो. याच ठिकाणी जिजामाता उद्यान व वाहनतळ आहे. पालिकेच्या मंजूर झालेल्या वाहतूक आराखड्यात हा भाग "नो पार्किंग झोन' झाला आहे. त्यामुळे पालिकेने येथील फेरीवाले व विक्रेत्यांना येथे व्यवसाय करण्यास मज्जाव केला आहे. हा प्रमुख मार्ग असल्याने वाहतूक व पादचाऱ्यांची वर्दळ असते. काही महिन्यांपासून हा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांनीही मोकळा श्‍वास घेतला; परंतु आता या ठिकाणी मासळी विक्रेत्यांनी ठाण मांडण्यास सुरुवात केली आहे. महामार्गावर बेकायदा मासळी व्यवसाय केल्यानंतर विक्रेते आता शहरातील जागांवर बस्तान बसवत आहेत. पालिकेने शहरातील कुंभारआळी भागात मासळी बाजाराची इमारत व्यवसायासाठी दिली आहे. तरीही उघड्यावर व्यवसाय सुरू आहे. संध्याकाळी उद्यानासमोर बसलेल्या विक्रेत्यांमुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना नाक दाबून जावे लागत आहे, तर मोकळ्या वातावरणासाठी बागेत येणाऱ्या मुलांना व ज्येष्ठांना दुर्गंधीमुळे बागेतून काढता पाय घ्यावा लागत आहे. पालिकेकडून या विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. याबाबत महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी या विक्रेत्यांना तत्काळ हटवले जाईल, असे सांगितले. 

Web Title: Citizens suffer due to the fish market