सिंधुदुर्ग : देवस्थानाच्या मानपानावरून दोन गटात वाद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 May 2019

वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड-पेंडूर येथील एका देवस्थानाच्या मानपानावरून दोन गटात जोरदार वाद झाले. यावेळी लोखंडी रॉडसह काचेच्या बाटलीच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तब्बल ३९ जणांवर गुन्हा दाखल करून वेंगुर्ले पोलिस अधिक तपास करत आहेत.

वेंगुर्ला -  तालुक्‍यातील पेंडूर येथे वाडवळच्या कारणावरून रविवारी व सोमवारी दोन गटांत तुफान हाणामारी झाली. याबाबत वेंगुर्ला पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंद झाल्या आहेत. दोन्ही गटांतील एकूण 39 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

यातील प्रकाश श्रीधर गावडे यांच्या डोक्‍याला व छातीला, श्रीधर पांडुरंग गावडे यांच्या पाठीला डाव्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, पेंडूर येथे सीआरएफ बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावातील वातावरण तणावपूर्ण आहे.
तालुक्‍यातील पेंडूर घोडेमुख देवस्थानच्या काल रविवारी झालेल्या वाडवळाच्या कार्यक्रमास भावकीला न सांगता संतोष गावडे याने देवतेस बकरे कसे मानविले, अशी विचारणा केली. त्यावेळी शांताराम जगन्नाथ गावडे यांना शिगेने, हाताच्या थापटांनी मारहाण केली. मारहाणीवेळी त्यांच्या गळ्यातील चेन गहाळ झाली. या प्रकरणी शांताराम गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंडूर येथीलच संतोष दशरथ गावडे, प्रभाकर दशरथ गावडे, शंकर दशरथ गावडे, संभाजी मोहन गावडे, लक्ष्मण लवू गावडे, नरेंद्र एकनाथ गावडे, सदाशिव सखाराम गावडे, हितेश प्रभाकर गावडे, शुभंकर शंकर गावडे व मयूरेश भिकाजी राऊत आदींवर गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी मोहन गावडे गावच्या देवतेची गेली १४ वर्षे पूजा करीत आहेत. दर तीन वर्षांनी गावातील लोकांकडून वर्गणी गोळा करून घोडेमुख देवतेचे वाडवाळ कार्यक्रम करतात. काल रविवारी वाडवळाचे पूर्ण गावात निमंत्रण दिले होते. बकरे मानवून परत येताना शांताराम जगन्नाथ गावडे, न्हानू उर्फ गोट्या गणेश गावडे, श्‍याम भगवान गावडे, जगन्नाथ शांताराम गावडे, गणेश न्हानू गावडे, वासुदेव सहदेव गावडे, प्रकाश श्रीधर गावडे, नवनाथ पांडुरंग गावडे, अविनाश मोहन गावडे आदींनी शिगेने व सोडावॉटरच्या बाटलीने मारहाण केली, अशी फिर्याद संभाजी मोहन गावडे यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिली आहे. त्यानुसार शांताराम गावडेसह नऊजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

रविवारच्या घोडेमुख देवस्थानचे वाडवळाच्या कारणावरून निर्माण झालेल्या रागातून सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पेंडूर गावडेवाडी येथील श्रीधर पांडुरंग गावडे यांना हितेश प्रभाकर गावडे, संतोष दशरथ गावडे, प्रवीण प्रभाकर गावडे, झिलू बाबाजी गावडे, सुनील लक्ष्मण गावडे, मयूर भिकाजी राऊत, दीपक सुदर्शन गावडे यांनी शिग, दांडा यांनी तसेच बाटली फेकून व हाताचे ठोशाने मारहाण केली. याबाबत श्रीधर गावडे यानी दिलेल्या तक्रारीनुसार हितेश गावडेसह सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

पेंडूर गावडेवाडी येथील सागर भिवा गावडे याचे वडील व पत्नी घरात बसलेले होते. त्याच वेळी शरद उर्फ वासुदेव सहदेव गावडे नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी आला. तो चहा पित असताना संतोष दशरथ गावडेने बॅट घेऊन आला आणि त्याने शरद गावडेला बॅटीने मारले. त्यास सोडविण्यास गेलेले सागर बॅटचा फटका लागल्याने जखमी झाले. या प्रकरणी सागर भिवा गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष दशरथ गावडेवर गुन्हा दाखल आहे. चारही हाणामारीच्या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण नाईक व सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम जाधव, कॉन्स्टेबल विठ्ठल धुरी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clash between two groups in Sindhudurg