स्वच्छता अभियानात आरे जिल्ह्यात तृतीय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

देवगड - तालुक्‍यातील आरे गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्‍यात प्रथम, तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. रोख दोन लाख रुपयांसह पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाले. 

देवगड - तालुक्‍यातील आरे गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुक्‍यात प्रथम, तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला. रोख दोन लाख रुपयांसह पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाले. 

तालुक्‍यातील 72 सर्व ग्रामपंचायतींमध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये स्वच्छ घर सजावट स्पर्धा, स्वच्छ गोठा स्पर्धा, स्वच्छता अभियान, हात धुवा दिन, जागतिक शौचालय दिन, वैयक्तिक स्वच्छता जनजागृती, शाळेमध्ये स्वच्छतेसंदर्भात मार्गदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात आले होते. यामध्ये आरे गावाने तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कट्टा गाव द्वितीय व कुणकवण गाव तृतीय आले. या सर्व गावांची तपासणी गटविकास अधिकारी विजय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. तालुक्‍यात प्रथम आलेल्या आरे व द्वितीय आलेल्या कट्टा गावाची तपासणी जिल्हास्तरावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. बा. क.) श्री. रसाळ व क्षमता बांधणी व समुदाय विकास तज्ज्ञ रुपाजी किनळेकर यांनी केली. गुणपत्रिकेनुसार तपासणी करण्यात आली. यामध्ये वैयक्तिक शौचालय, पाणीपट्टी वसुली, नळ जोडणी, इंटरनेट, शाळा, अंगणवाडी हात धुवासाठी स्वतंत्र व्यवस्थापन तसेच शौचालय पाहणी, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य उपकेंद्राची माहिती, लोकसहभागातून झालेली विकासकामे, गावातील एकोपा, पाण्याची सुविधा व शुद्धीकरण तसेच संत गाडगेबाबा अंतर्गत राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती तसेच शासकीय इमारतींची पाहणी करण्यात आली होती. जिल्हास्तरावर आरे गावाला तृतीय क्रमांक मिळाला. आरे सरपंच महेश पाटोळे व ग्रामसेवक वैभव ठाकूर यांना पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. तालुक्‍यात द्वितीय क्रमांक प्राप्त कट्टा गावच्या सरपंच संगीता करंगुटकर व ग्रामसेविका श्रद्धा वळंजू व तालुक्‍यात तृतीय क्रमांक प्राप्त कुणकवण गावच्या सरपंच सुनीता पवार व ग्रामसेवक शरद खोत यांचेही पुरस्कार वितरण या वेळी झाले. 

Web Title: Cleaning campaign