काथ्या प्रशिक्षण केंद्रे बंदावस्थेत 

काथ्या प्रशिक्षण केंद्रे बंदावस्थेत 

मालवण - पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या चांदा ते बांदा योजनेतून महिलांना रोजगार देण्यासाठी जिल्ह्यात काथ्या प्रशिक्षण केंद्र उभारली गेली; मात्र ही सर्वच केंद्रे बंदावस्थेत आहेत. हडी-गावकरवाडीतील (ता.मालवण) स्मशानभूमी लगत 50 लाख रुपये खर्चून उभारलेल्या इमारतीत दहा लाखांची बसविलेली मशिनरी सध्या उघड्यावर सडत आहे. "स्वाभिमान'च्या पदाधिकाऱ्यांनी या बाबींचा पर्दाफाश केला. 

गेले वर्षभर याठिकाणी एकही अधिकारी फिरकलेला नसल्याचे काथ्याचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी सांगितले. स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी या केंद्राला भेट दिली. चांदा ते बांदा योजनेतून रोजगार उपलब्ध करून दिल्याचा गाजावाजा केला जात आहे. याच योजनेतंर्गत उभारलेली काथ्या प्रशिक्षण केंद्रे सध्या वापराविनाच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सावंत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार राऊत यांच्या तळगावमधील काथ्या प्रशिक्षण केंद्र बंद असल्याचा पोलखोल केल्यानंतर शिवसेनेचे नेते दत्ता दळवी यांनी पत्रकार परिषद घेत ही "स्वाभिमान'ची नौटंकी असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी हडी गावकरवाडी येथील केंद्राला भेट दिली. यावेळी "स्वाभिमान'चे लोकसभा मतदारसंघ उपाध्यक्ष बाबा परब, छोटू सावजी, वंदना गोलतकर आदी उपस्थित होते. 

गावकरवाडीतील प्रशिक्षण केंद्र चक्क स्मशानभूमीला लागूनच असलेल्या जागेत उभारले आहे. त्यामुळे स्मशानभूमी काहीशी पुढे हलविल्याचे स्थानिकांनी सांगितले. मागील वर्षी गावातील 30 महिलांना काथ्याचे प्रशिक्षण देऊन एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात आले. त्यानंतर गावकरवाडीत प्रशिक्षण केंद्र उभारल्यावर महिलांना रोजगार मिळेल असे स्पष्ट केले होते. मात्र केंद्र उभारल्यानंतर एकही अधिकारी तेथे फिरकला नसल्याचे प्रशिक्षणकर्त्यांनी सांगितले. येथे इमारत उभारली असली तरी 10 लाखांची बसविलेली मशिनरी उघड्यावरच आहे.

या मशिनरीची देखभाल करण्यासाठी येथे सुरक्षारक्षकही नाहीत. त्यामुळे या मशिनरीच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. पालकमंत्र्यांकडून रोजगार देण्याच्या केवळ गप्पा मारल्या जात आहेत. यातून केसरकर, आमदार वैभव नाईक यांची निष्क्रियता समोर आली असल्याचा आरोप सावंत यांनी केला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रसामुग्री ठेवण्याचा इशारा 
सिंधुदुर्गात 9 ठिकाणी 10 कोटी रुपये खर्चून काथ्या प्रशिक्षण केंद्रे सुरू केली; मात्र 10 कोटी खर्चून 10 महिलांना देखील रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे निधीचा अपव्यय झाला आहे. मागील आठवड्यात राऊत यांच्या तळगावातील केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर हडीला भेट दिली असता येथे 50 लाख खर्चून इमारत बांधल्याचे निदर्शनास आले. येत्या एका महिन्यात हे प्रशिक्षण केंद्र सुरू न झाल्यास सर्व यंत्रसामुग्री जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन ठेवू, असा इशारा श्री. सावंत यांनी दिला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com