बिबट्याचे पाहून हल्ले, पथक पुन्हा रत्नागिरीत आले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुन्हा एकदा पुण्याहून पथक दाखल झाले आहे. गस्त करून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पावस : पावस-पूर्णगड मार्गावरील मेर्वी-बेहेरे टप्पा येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण आहे. बिबट्या पडण्यासाठी आलेली पथकेही हात हलवत परत गेली. त्यामुळे येणाऱ्या-जाणारे वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याच्या आजूबाजूची झाडेझुडपे सार्वजनिक बांधकाम खात्याने तोडण्यास सुरवात केली आहे. 

हेही वाचा -  रत्नागिरीत रुग्णालयांची होणार चौकशी ;रुग्णांवर कोणते उपचार केले, किती केले बिल..? 

 

बिबट्याच्या हल्ल्यानंतर वनविभाग आणि त्यांच्या पथकाला बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही. 5 सप्टेंबरला एका शेतकऱ्यांवर जांभूळ आड येथे हल्ला केला होता. वनविभागातर्फे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मुंबई व पुणे येथून पथके दाखल झाली होती. 13 सप्टेंबरला दोन्ही पथके हात हलवत परत गेली. पथके गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी बिबट्याने मेर्वी-बेहेरे टप्पा परिसरातील जंगलमय भागात रात्री तीन दुचाकीस्वारांवर हल्ला केला. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यानंतर वनविभागाने घटनेचा पंचनामा करून पुन्हा नव्याने कॅमेरा आणि पिंजरा लावला. 

प्रांताधिकारी व तहसीलदारांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. सरपंच व ग्रामस्थांनी त्यांना माहिती दिली. त्यानंतर येथील संभाव्य धोका कमी करण्यासाठी परिसरातील धोकादायक असलेली झाडेझुडपे तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभागाने झाडेझुडपे तोडण्यास सुरवात झाली आहे. तसेच पावस ते पूर्णगड या सागरी मार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने बिबट्याचे बाधित क्षेत्र कळावे यासाठी वनविभागाने ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुन्हा एकदा पुण्याहून पथक दाखल झाले आहे. गस्त करून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अद्याप यश आलेले नाही. या परिसरात वनविभागाचे अधिकारीही फिरत आहेत. 

हेही वाचा - कोकण टाकतंय सिनेसृष्टीच्या दिशेने पाऊल ; स्थानिक कलाकारांसाठी संधी 

ड्रोन कॅमेऱ्याने हालचाली टिपाव्यात

वनविभागाला जंगल भागात जाऊन त्याचे ठिकाण शोधणे कठीण बनल्याने ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून त्याच्या हालचाली टिपून त्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the committee return to found a leopard in ratnagiri leopard attack on various places in kokan