बदनामीकारक पोस्ट व्हायरल प्रकरणी आमदाराची उद्योजका विरूद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

ज्या मोबाईल क्रमांकावरुन पोस्ट टाकण्यात आली, त्या मोबाईल क्रमांकाचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. त्यातच, फॉरवर्ड केलेल्या पोस्टमधील व्हायरल मेसेजची प्रतदेखील तक्रारीसोबत जोडण्यात आली आहे.

राजापूर - सोशल मीडियावरून अपमानास्पद आणि बदनामी करणारी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी उद्योजक किरण सामंत आणि केतन पवार यांच्याविरोधात रत्नागिरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली, अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. साळवी म्हणाले, ‘‘गुरुवारी (ता. ३१) दुपारी दोन वाजून दोन मिनिटांनी ठेकेदार संघटना, रत्नागिरी या सोशल मीडियावरील व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर आमदार राजन साळवी यांच्या विरुद्ध अपमानास्पद व त्यांची बदनामी करणारी पोस्ट पडल्याचे निदर्शनाला आले. ही पोस्ट कुणी तयार केली ते समजू शकलेले नाही; मात्र, उद्योजक केतन पवार व किरण सामंत यांनी ती फॉरवर्ड केल्याचे निदर्शनाला आले. यामुळे आपल्याविरुध्द बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी किरण सामंत, केतन पवार आणि ती पोस्ट तयार करणाऱ्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल व्हावा व कारवाई व्हावी, अशी तक्रार रत्नागिरी पोलिसात दाखल केली आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरुन पोस्ट टाकण्यात आली, त्या मोबाईल क्रमांकाचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. त्यातच, फॉरवर्ड केलेल्या पोस्टमधील व्हायरल मेसेजची प्रतदेखील तक्रारीसोबत जोडण्यात आली आहे.’’

आमदार साळवी यांनी बदनामी झाल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीवर पोलिस आता कोणती कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

अन्य कोणाचा हस्तक्षेप नको!

राजापूर मतदारसंघाचे पालकत्व आमदार साळवी यांच्याकडे असून या मतदारसंघात अन्य कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, राजापूरचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, लांजाचे तालुकाप्रमुख संदीप दळवी यांनी दिली आहे.

बैठकीत पोस्टचा निषेध

विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या राजापूर मतदारसंघाची आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत राजापूरला बैठक झाली. या बैठकीत सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या पोस्टद्वारे साळवी यांच्या झालेल्या बदनामीचे पडसाद उमटले. बैठकीत पोस्टबाबत निषेध करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaint Against Entrepreneur In Defamation Post Viral Case