महावितरणविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

महाड - महावितरणकडे वारंवार मागणी करूनही शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्‍यक असलेला वीजपुरवठा वेळेत न मिळाल्याने आपले एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दासगाव येथील शेतकऱ्याने केली आहे. महावितरणच्या या कारभाराविरोधात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दाद मागितली आहे. 

महाड - महावितरणकडे वारंवार मागणी करूनही शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्‍यक असलेला वीजपुरवठा वेळेत न मिळाल्याने आपले एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दासगाव येथील शेतकऱ्याने केली आहे. महावितरणच्या या कारभाराविरोधात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दाद मागितली आहे. 

करंजखोल येथील दीपक आंब्रराळे याची दासगाव येथे शेतजमीन आहे. तेथे त्यांनी शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसायासाठी त्यांनी आयडीबीआय बॅंकेकडून कर्ज काढून विंधन विहीर खोदली आहे; परंतु या विंधन विहिरीसाठी महावितरणने वीजपुरवठा दिलेला नाही. त्यासाठी आंब्रराळे हे 24 मार्चपासून महावितरणकडे पाठपुरावा करीत आहेत. या वर्षी त्यांनी रब्बी हंगामात कलिंगडाची लागवड केली होती. त्यासाठी डोक्‍यावरून ओढ्याचे पाणी आणून त्यांनी कलिंगडे जगवली; परंतु शेवटच्या दिवसांत ओढ्यातील पाणी संपल्याने त्यांचे 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी कर्ज काढून विंधन विहीर खोदली व त्यावर पंपही बसवला होता. शेतीसाठी वीज पुरवण्याची मागणी त्यांनी महावितरणकडे केली होती; परंतु कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली महावितरणने त्यांना वीजजोडणी देण्यास टाळाटाळ केली. याचदरम्यान उष्णतेची लाट आल्याने त्यांच्या अंडी देणाऱ्या कोंबड्याही मरण पावल्या. त्यामुळे आंब्रराळे हे पूर्णपणे हवालदिल झाले. त्यांना वारंवार महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. या कार्यालयात अर्थकारण चालत असल्याने त्यांना तातडीने वीजपुरवठा देण्यास महावितरणकडून टंगळमंगळ केली जात होती. अखेर त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने आपली व्यथा थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली आहे. या पत्राची दखल घेऊन पुढील कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

...तर कोकणातही आत्महत्या 
राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. अद्याप कोकणातील शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही; परंतु महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसारख्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास कोकणातील शेतकऱ्यालाही आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, अशी कैफियत आंब्रराळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात मांडली आहे. 

Web Title: Complaint to the Chief Minister against MSEB