जिल्ह्यात युतीबाबत संभ्रम कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सावंतवाडी - शिवसेना- भाजप युतीवरून सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. नेते युतीसाठी आग्रही असले तरी कार्यकर्ते स्वबळाची भाषा करत आहेत. नेते युतीचे चित्र लवकरच स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी त्याला यश येत नसल्याने इच्छुक संभ्रमात आहेत. 

सावंतवाडी - शिवसेना- भाजप युतीवरून सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. नेते युतीसाठी आग्रही असले तरी कार्यकर्ते स्वबळाची भाषा करत आहेत. नेते युतीचे चित्र लवकरच स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी त्याला यश येत नसल्याने इच्छुक संभ्रमात आहेत. 

आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात, युती नको, अशी मागणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांतून होत आहे. ग्रामीण भागात अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी पक्षाकडून हा निर्णय घ्यावा, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे पालिका निवडणुकीत स्वबळाची भाषा करून हात भाजलेले दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सन्मानाचा आव आणून स्वबळाची भाषा करीत आहेत; परंतु युती तुटल्यास त्याचा फायदा कॉंग्रेसला होणार आहे. त्यामुळे स्वबळावर लढणे शक्‍य नाही, असे नेत्यांचे म्हणणे आहे; मात्र युती की स्वबळावर लढायचे या दुहेरी कात्रीत वरिष्ठ नेते सापडल्याने पाडापाडीचे राजकारण रंगण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत सर्वच पक्षांकडून स्वबळावर लढण्याची भाषा करण्यात आली. यात शिवसेना, भाजप आघाडीवर होते. पालकमंत्री दीपक केसरकर हे आपल्या स्वबळाच्या निर्णयावर अडून राहिले. त्याला भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी जोरदार विरोध केला. त्यांना दुसरे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक अशा अनेक नेत्यांची इच्छा असताना सुद्धा या निवडणुका स्वबळावर झाल्याच. त्याचाच फायदा कॉंग्रेसने घेतला आणि अनेक ठिकाणी कॉंग्रेस फायद्यात गेली आहे. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून युतीचे नेते युतीसाठी आग्रही आहेत. 

सद्यःस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषद आणि बहुतांशी पंचायत समित्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा राजकारणात शिरकाव करण्यासाठी राणे या निवडणुका प्रतिष्ठेच्या करणार आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी आघाडी करून पुन्हा एकदा एकत्र येऊन निवडणुका लढविण्यात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीची जिल्ह्यात म्हणावी तशी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे आपले आहे ते यश टिकविण्यासाठी त्यांना कॉंग्रेससोबत राहणे योग्य ठरणार आहे. यामुळे त्याचा त्यांना फायदा होणार आहे. 

या सर्व परिस्थितीत स्वबळाचा दावा करणारे शिवसेना- भाजपचे कायेकर्ते फसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी आता शिवसेना आणि भाजपचे नेते नेमकी कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे 

आयातांना संधी नको 
कॉंग्रेसवर मात करण्यासाठी शिवसेना- भाजपकडून काही लोकांना निवडणुकाच्या पार्श्‍वभूमीवर आयात करून त्यांना थेट उमेदवारी देण्याची धोरणे पक्षांच्या नेत्यांकडून आखण्यात येत आहे; मात्र अशा प्रकारे सर्वसामान्य तसेच अनेक वर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आयत्या वेळी डावलून अन्य आयात चेहरे नको, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरीत आहे.

Web Title: confusion about the Alliance