कॉंग्रेसकडून चार नवे तालुकाध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

सिंधुदुर्गनगरी - कॉंग्रेसनेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेश चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर आज 8 पैकी 4 तालुकाध्यक्ष नव्याने नियुक्त करण्यात आले. शिवाय आठही तालुक्‍यांसाठी निरीक्षक नेमले गेले. पदे रिक्त असल्याने या नियुक्‍त्या केल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले असले, तरी बहुसंख्य पदावर राणेसमर्थकांची वर्णी लागली आहे. 

सिंधुदुर्गनगरी - कॉंग्रेसनेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेश चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर आज 8 पैकी 4 तालुकाध्यक्ष नव्याने नियुक्त करण्यात आले. शिवाय आठही तालुक्‍यांसाठी निरीक्षक नेमले गेले. पदे रिक्त असल्याने या नियुक्‍त्या केल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले असले, तरी बहुसंख्य पदावर राणेसमर्थकांची वर्णी लागली आहे. 

राणे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा गेले पंधरा दिवस प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहे. राणेंनी याचा इन्कार केला असलातरी संभ्रमाचे वातावरण कायम आहे. सर्वाधिक संभ्रम कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा कार्यकारिणीची बैठक ओरोस येथे झाली. ही बैठक बंद खोलीत घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी 23 ला होणाऱ्या कॉंग्रेसच्या स्नेहसंमेलन नियोजनासाठी बैठक घेतल्याचे सांगितले. त्यांनी 4 तालुकाध्यक्ष आणि 8 निरीक्षकांच्या नियुक्‍त्या केल्याचेही जाहीर केले. 

कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुकाध्यक्षपदी अरविंद राणे, कुडाळ- रणजित देसाई, देवगड-अमोल तेली व संदीप साटम तर दोडामार्ग अध्यक्षपदी रमेश दळवी यांची नियुक्ती केली. तालुका निरीक्षक म्हणून दोडामार्ग- संजू परब, वेंगुर्ले- अशोक सावंत, कुडाळ- सतीश सावंत, मालवण- संदेश ऊर्फ गोट्या सावंत, देवगड- मिलिंद कुलकर्णी, वैभववाडी- शरद कर्ले, सावंतवाडी- मधुसूदन बांदिवडेकर, कणकवली- विकास कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. 

ही पदे रिक्त असल्याने भरल्याचा दावा जिल्हाध्यक्ष सामंत यांनी केला; मात्र नियुक्त झालेले बहुसंख्य पदाधिकारी राणेंसोबत शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेले किंवा राणेंचे समर्थक म्हणून ओळख असलेले आहेत. त्यामुळे या नियुक्‍त्या चर्चेचा विषय ठरले आहेत. 

शिरवलकर यांची फेरनिवड 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या कॉंग्रेस युवक अध्यक्षपदी आनंद शिरवलकर यांची फेरनिवड करण्यात आली. ही व अन्य सर्व निवडी कॉंग्रेसनेते नारायण राणे यांच्या लेखी सूचनेनंतर करण्यात आल्याची माहिती या वेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सामंत यांनी दिली. 

प्रदेश कॉंग्रेस सक्रिय 
राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे कॉंग्रेस सक्रिय झाली आहे. आजच्या बैठकीला जुन्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. मुंबईहून कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्षाच्या निष्ठावंतांशी संपर्क वाढविला आहे. यात एका खासदाराकडे जबाबदारी दिली असल्याचे समजते. 

Web Title: Congress change taluka president