हकालपट्टीच्‍या चाहुलीनेच पक्षत्याग

हकालपट्टीच्‍या चाहुलीनेच पक्षत्याग

वैभववाडी - पक्षातून हकालपट्टी होणार हे निश्‍चित असल्याने जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोडसाळ आहेत, असे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी येथे व्यक्त केले.

येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या वेळी बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, नासीर काझी, वैशाली रावराणे, प्राची तावडे, भारती रावराणे आदी उपस्थित होते.

श्री. साठे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद सदस्य सौ. चोरगे यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांची लवकरच काँग्रेस पक्षातून हकालपट्टी होणार हे निश्‍चित होते. त्यामुळे पक्षातून आपली हकालपट्टी होणार हे निश्‍चित झाल्याचे समजताच त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा नव्हे तर जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. पक्षातून बाहेर पडताना त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले आहेत. नगरपंचायत निवडणूक होऊन दीड वर्ष झाले आणि आता सौ. चोरगे या निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपणास नजरकैदेत ठेवले होते असा आरोप करीत आहेत. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांना हे कसे काय सुचले? काँग्रेस पक्षात महिलांचा कायम सन्मानच केला जातो. गेल्या निवडणुकीत माजी सभापती शुभांगी सरवणकर या इच्छुक असूनदेखील त्यांना उमेदवारी न देता सौ. चोरगे यांना आयात करून उमेदवारी देण्यात आली आणि निवडूनही आणले. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचे महिला आणि बालकल्याण सभापतिपद देण्यात आले. हा त्यांच्यावर अन्याय केला का? त्या गेली अनेक वर्षे विविध पक्षांत राजकारणात आहेत. तेथील अनुभव आणि काँग्रेसमधील अनुभव याची त्यांनी अंर्तमनात तुलना करावी. काँग्रेसमध्ये काम करीत असताना त्या कार्यकर्त्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना अजिबात विश्‍वासात घेत नव्हत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. ज्या विश्‍वासाविषयी त्या बोलत आहेत, तो आपोआप मिळत नाही. तो संपादित करावा लागतो.’’

ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणले त्यांचासुद्धा त्यांना विसर पडला, यासारखे दुर्दैव नाही. पक्षात अनेक महिला आहेत. त्यांचा नेहमीच सन्मान केला जातो. त्यामुळे सौ. चोरगे यांचे सर्व आरोप खोटे आहेत. निव्वळ कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम त्या करीत आहेत. मात्र त्यांचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्या विचारांवर चालणारा हा पक्ष आहे.’’

काँग्रेसमध्ये महिलांचा सन्मानच
काँग्रेस पक्षात महिलांना सन्मान दिला जातो; मात्र स्नेहलता चोरगे यांची तक्रार आहे ती स्थानिक कार्यकर्त्याबाबत आहे. राणे कुटुंबीयांबाबत त्यांनी आदर व्यक्त केला आहे. त्यामुळे मी त्यांना नजरकैदेत ठेवलेले नाही, असे आमदार नीतेश राणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. चोरगे यांना पक्षात कुणाकडूनही अपमानास्पद वागणूक मिळलेली नाही. माझा अशा कोणत्याही घटनेशी संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नजरकैद नाहीच
वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू होता. त्या वेळी आम्ही पक्षातील सर्व महिला एकत्रच प्रचार करीत होतो. निवडणुकीच्या आदल्या दिवशीसुद्धा आम्ही सर्व एकत्र होतो; परंतु कुठेही स्नेहलता चोरगे यांना नजरकैदेत ठेवलेले नाही. त्यांच्यासोबत सातत्याने आम्ही होतो. त्यांनी आमदार नीतेश राणेंवर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सभापती शुभांगी पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

स्वनिधी मालवणसह एडगावात कसा?
जिल्हा परिषद सदस्य सौ. चोरगे यांनी जिल्हा परिषद स्वनिधीतून आपल्या ऊसशेतीत रस्ते तयार करणे, सौरदीप बसविणे ही कामे केली. एवढेच नव्हे तर मतदारसंघात खर्च करावयाच्या निधीपैकी काही स्वनिधी मालवण तालुक्‍यात खर्च केला, तर काही निधी एडगावात खर्च केल्याचा आरोप श्री. रावराणे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com