जिल्ह्यात काँग्रेसमध्ये सर्वाधिक बंडखोरीची शक्‍यता

- अमोल टेंबकर
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - निवडणुकीच्या काही दिवस अगोदर राज्यस्तरावरून युतीचे दोर कापण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती अचानक बदलली आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. या सर्व परिस्थितीत नाराजांना तिकिटाचे आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपसह शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. बंडोबांना थंड करण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. 

सावंतवाडी - निवडणुकीच्या काही दिवस अगोदर राज्यस्तरावरून युतीचे दोर कापण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती अचानक बदलली आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. या सर्व परिस्थितीत नाराजांना तिकिटाचे आमिष दाखवून आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपसह शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. बंडोबांना थंड करण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. 

बंडखोरांना सर्वच पक्षांकडून सावध पवित्रा घेण्यात आल्याचे चित्र आहे. आयत्या वेळी बंडखोरांकडून अन्य पक्षांकडून आव्हान नको यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काही तास अगोदर एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. आयत्या वेळी डावलण्यात आलेल्या बंडोबांना शेवटपर्यंत पक्षाच्या आदेशाची वाट पाहत बसावे लागणार किंवा थेट अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. 

तालुक्‍यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी झाली, तरी तालुक्‍यात राष्ट्रवादीची म्हणावी तशी ताकद नसल्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेस जास्तीत जास्त जागांवर दावा करण्याची शक्‍यता आहे. काल (ता. ३१) झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सुद्धा यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे काही झाले तरी आपण निवडून येणार अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काँग्रेसमधून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आयत्या वेळी बंडखोरी होण्याची शक्‍यता काँग्रेसमध्ये जास्त आहे. कारण त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. बंडखोरांना रोखण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीची ताकद म्हणावी तशी नसल्यामुळे त्या पक्षातून कोणी निवडणूक लढविण्यास तयार नाहीत. त्याचाच फायदा शिवसेना व भाजपकडून घेण्यात आला आहे. काही चेहरे सोडले तर दोन्ही पक्षांकडे ताकदीचे चेहरे नाहीत. दुसरीकडे राज्यातून युतीची दारे बंद करण्यात आल्याने आयत्या वेळी दोन्ही पक्षांवर नव्याने चेहरे शोधण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही कार्यकर्त्याला तयार करणे शक्‍य नसल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ताकदवान चेहऱ्यांना फोडण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. 

तळागाळात चिन्ह पोचविण्यासाठी धडपड
शिवसेनेकडून काही मतदारसंघांत उमेदवार इच्छुक असले तरी बऱ्याचशा मतदारसंघांत त्यांना उमेदवार शोधावे लागणार आहेत. काही ठिकाणी शिवसेनेतही बंडखोरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भाजप मात्र या सर्व परिस्थितीत जिल्ह्यातील आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. सद्यःस्थितीत म्हणावी तशी ताकद नसली तरी स्वबळावर लढल्यानंतर तळागाळापर्यंत आपले चिन्ह पोचेल आणि या निमित्ताने आपले कार्यकर्ते वाढतील, असे भाजपचे गणित आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीचा विचार लक्षात करता काँग्रेससह सर्वच पक्षांत बंडखोरी अटळ आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी आता पक्षाच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.

Web Title: Congress in the district most likely insurgency