पक्षविरोधी कारवायांवरून मुंबईतील बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता

शुक्रवार, 17 मे 2019

चिपळूण - लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अंतर्गत आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वानेच पक्षविरोधी काम केल्याचे आरोप झाले. तशा तक्रारीही वरिष्ठांकडे करण्यात आल्या.दरम्यान, मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेसच्या टिळक भवनात १८ मे रोजी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. पक्षविरोधी कारवायांवरून बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

चिपळूण - लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अंतर्गत आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वानेच पक्षविरोधी काम केल्याचे आरोप झाले. तशा तक्रारीही वरिष्ठांकडे करण्यात आल्या.

दरम्यान, मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेसच्या टिळक भवनात १८ मे रोजी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. पक्षविरोधी कारवायांवरून बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे कोकणचे निरीक्षक बी. एम. संदीप यांनी काँग्रेसच्या मुंबईतील टिळक भवन कार्यालयात या बैठकीचे आयोजन केले आहे. १८ मे रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान ही बैठक होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पक्षविरोधी कारवायानंतर आयोजित केलेली ही बैठक महत्वाची मानली जाते. जिल्हा काँग्रेसमध्ये नेहमीच नवा व जुना असे दोन गट राहिले आहेत. लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर त्वरित काहींनी पक्षविरोधी काम केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. यामुळे टिळक भवनात होणाऱ्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या बैठकीसाठी सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर यांनी केले आहे.

आरोपांच्या फैरी झाडल्या
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी- सिधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नवीनचंद्र बादिवडेकरांना उमेदवारी दिली होती. मात्र, जिल्हाध्यक्ष रमेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बांदिवडेकरांच्या विरोधी प्रचार केल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी केला होता. त्यावरून तालुका प्रवक्‍त्यानीही शहांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यामुळे जिल्हा काँग्रेसमधील वाद उफाळून आले होते.