शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- विरोधक

सुनील पेटकर
बुधवार, 17 मे 2017

अंतिम टप्प्यातील या यात्रेमध्ये माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, दिलिप वळसे पाटील, माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्षा स्नेहल जगताप उपस्थित होते. 

महाड - शेतीमालाला दर नाही, तूरडाळ खरेदी नाही, शेतकऱ्यांच्या ६४ टक्के आत्महत्या वाढल्या आहेत. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. असे स्पष्ट करत आगामी अधिवेशनामध्ये याबाबत काय भूमिका घ्यायची हे लवकरच बैठकीत ठरेल असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व विरोधी पक्षांतर्फे काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेचे आज (बुधवार) 17 मे ला रायगड येथे आगमन झाले. अंतिम टप्प्यातील या यात्रेमध्ये माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, दिलिप वळसे पाटील, माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्षा स्नेहल जगताप उपस्थित होते. 

आज सकाळी या संघर्ष यात्रेतील नेत्यांनी रायगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. येथील उपस्थितानी होळीच्या माळावरील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जगदिश्वराचे दर्शन घेतले व सरकारला सदबुध्दी देण्याची व कर्जमाफीसाठी साकडे घातले तेथून चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यानंतर येथील सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

या परिषदेत उपस्थितांनी संघर्ष यात्रेमागील उद्देश स्पष्ट केला. अजित पवार यांनी चवदार तळे व रायगड येथून प्रेरणा घेऊन या संघर्ष यात्रेचा अंतिम टप्पा आम्ही सुरू केला आहे. ही संघर्ष यात्रा निश्चितच निर्णायक ठरेल. शेतकऱ्याच्या न्याय व हक्कासाठी सर्व विऱोधी पक्षांनी काढलेल्या या यात्रेला यश येईल, असा विश्वास व्यक्त केला. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे रोज नवीन प्रश्न पुढे येत आहेत. 

राधाकृष्ण विखेपाटील यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे व शेतीमालाला ५० टक्के नफा मिळवून देणे, या प्रमुख उद्देशासाठी संघर्ष यात्रा असून कोकणात मच्छीमार, बागायतदार यांचे प्रश्न जरी वेगळे असले तरीही राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शासन मात्र उदासिन भूमिका घेत आहे. संघर्ष यात्रेचा दबाव वाढल्यानेच सरकारला संवाद यात्रा काढावी लागली असे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावरही त्यांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राजीनामा खिशात घेऊन फिरणारे शिवसेनेचे आमदार राजीनामा का देत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी केला. संवाद यात्रेला शिवराळ संवाद यात्रा म्हटली पाहीजे अशी टिकाही त्यांनी दानवे यांच्या वक्तव्यावर केली. सुनील तटकरे यांनी कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न जरी भिन्न असले तरी भात उत्पादनाला किमान आधारभूत किंमत देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. तर अजित पवार यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात  भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. आज तीन वर्ष हे भात खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडेही या सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. यावेळी योगेंद्र कवाडे यांनीही आपले मत मांडले. 

या पत्रकार परिषदेत कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न या यात्रेत प्रभावीपणे मांडले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला वारंवार होणारे आंबा काजू नुकसान तर कोकणातील जलसिंचन प्रकल्प आघाडी सरकारच्या काळात रखडलेले होते. पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्प करण्यात आले. परंतु कोकणातील प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे यावेळी पत्रकारांनी मांडले. कोकणातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर समर्पक उत्तरे या परिषदेत देण्यात आली नाहीत. अलिशान गाड्या व संघर्ष यात्रा नामफलक लावलेल्या वातानुकुलीत आराम बसमधून हि यात्रा रत्नागिरीकडे रवाना झाली.

Web Title: Congress, NCP Sangharsh yatra starts in Raigad