काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कुडाळ - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने काँग्रेसचा उडविलेला धुव्वा लक्षात घेता त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. असे असले तरी दिग्गजांनी दुसऱ्या मतदारसंघात जाऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवले हे विशेष आहे.

कुडाळ - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने काँग्रेसचा उडविलेला धुव्वा लक्षात घेता त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. असे असले तरी दिग्गजांनी दुसऱ्या मतदारसंघात जाऊन आपले अस्तित्व टिकवून ठेवले हे विशेष आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कुडाळ तालुक्‍यात शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, अपक्षांसह १०३ उमेदवार रिंगणात होते. मतपेटीत बंद झालेला निकाल बाहेर पडल्यानंतर तो काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देणारा ठरला. जिल्हा परिषदेच्या नऊ जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात होते. कुडाळ नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली. काही नवीन मतदारसंघ आले. यामध्ये तेंडोली वर्षा कुडाळकर (शिवसेना), नेरूर रणजित देसाई (काँग्रेस), आंब्रड सतीश सावंत (काँग्रेस), पिंगुळी संजय पडते (शिवसेना), ओरोस अंकुश जाधव (राष्ट्रीय काँग्रेस) या दिग्गज नेत्यांनी दुसऱ्या मतदारसंघात जाऊनही मतदार व कार्यकर्त्यांच्या जोरावर मिळविलेला विजय निश्‍चितच कौतुकास्पद आहे. या मतदारसंघात मतदारांनी स्थानिक उमेदवारांना नाकारले. काही मतदारसंघात चुरशीची लढत झाली. शिवसेनेने जिल्हा परिषदेत ६, तर काँग्रेसने तीन जागा मिळविल्या. तिन्ही जागांवरील उमेदवार हे नवीन मतदारसंघात जाऊन विजयी झाले. प्रथमच भाजप शिवसेनेने स्वबळावर लढत दिली. यात भाजपाला मात्र खाते खोलता आले नाही. त्यांनी या निवडणुकीच्या निमित्त आपली निशाणी घरोघर पोचविण्याचा प्रयत्न केला. यदाकदाचित तालुक्‍यात सर्वच ठिकाणी युती झाली असती तर काँग्रेसची स्थिती आणखी बिकट झाली असती. घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघ यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आबा मुंज यांचे नेतृत्व होते; मात्र या बालेकिल्ल्याला शिवसेनेने सुरुंग लावत आपला भगवा फडकविला. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेला विकास, मतदारांना दिलेली आश्‍वासने ही या विजयाची नांदी ठरली. येथील प्रभाकर वारंग यांच्या नेतृत्वाखाली सुमारे साडेतीनशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत केलेला प्रवेशही विजयाला कारणीभूत ठरला. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर शिवसेना विजयी झाली. नेरूर मतदारसंघात शिवसेनेला काँग्रेसने दणका दिला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई हे पिंगुळीतील असूनही यांचे नेतृत्व मतदारांनी स्वीकारले. भाजपचे जिल्हा खजिनदार चारुदत्त देसाई व शिवसेनेचे अतुल बंगे अशी चुरशीची तिरंगी लढत झाली. शिवसेनेने पंचायत समितीच्या एका जागेवक यश मिळविले. पुन्हा हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी आमदार वैभव नाईक यांना व्यूहरचना करावी लागणार आहे. तेंडोली या नवीन झालेल्या मतदारसंघात शिवसेनेच्या महिला आघाडीप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या दोन्ही जागा शिवसैनिक, मतदारांच्या जोरावर आणत काँग्रेसचा दारुण पराभव केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, पंचायत समिती सदस्य माधवी प्रभू यांचे प्रयत्न अपुरे ठरले. जरी कुडाळकर हे विवेक मांडकुलकर यांच्या प्रचारात असले तरी यापूर्वी त्यांनी पिंगुळीतून निवडणूक लढविली होती. पिंगुळीतही श्री. कुडाळकर यांच्यासह माजी अध्यक्ष दिनेश साळगावकर, माजी सभापती मोहन सावंत, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली; मात्र ते काँग्रेसला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. एकूणच पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी पक्षावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. नव्याने निर्माण झालेल्या समाजकल्याण सभापतींच्या उमेदवारीने सर्वांचे लक्ष लागलेल्या ओरोस मतदारसंघात मात्र दोडामार्गचे अंकुश जाधव यांनी ‘अंकुश’ दाखविला. नऊ उमेदवार रिंगणात असतांनासुद्धा थोडक्‍या मतांनी ते विजयी झाले. या ठिकाणी युती असती तर काँग्रेसची कदाचित ही जागा कमी झाली असती. अशा प्रकारची परिस्थिती उर्वरित आंब्रड व नेरूर या दोन्ही मतदारसंघात असती. वेताळबांबर्डे हासुद्धा नव्याने मतदारसंघ अस्तित्वात आला. यामध्ये खासदार विनायक राऊत यांच स्वीय सहायक नागेंद्र परब यांनी विजयश्री आणली; मात्र वेताळबांबर्डे पंचायत समितीमध्ये स्नेहा दळवी या अवघ्या शंभर मतांनी पराभूत झाल्या. पावशी या नवीन मतदारसंघात माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचे सुपुत्र अमरसेन सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून या जागावर निवडणूक लढवून विजयी झाले. प्रतिस्पर्धी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांनासुद्धा चांगली मते मिळाली. माणगावमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकाविला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकारी यांची मेहनत पक्षाला विजयश्री देऊ शकली नाही.

राष्ट्रवादी फक्त नावाला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती कुडाळ तालुक्‍यात अतिशय दयनीय झाली आहे. पक्षाच्या उमेदवाराला सपशेल पराभवाला सामोरे जावे लागले. बऱ्याच मतदारसंघेंत त्यांना उमेदवारही मिळाले नाहीत.

Web Title: Congress office-bearers of the introspection