उपनगराध्यक्ष व सभापतिपद काँग्रेसने नाकारले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

चिपळूण - पालिकेच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपकडून काँग्रेसला देण्यात येणारी सर्व पदे काँग्रेसने नाकारली आहेत. शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ, अशी घोषणा माजी खासदार नीलेश राणे यांनी आज चिपळूण येथील पत्रकार परिषदेत केली.

चिपळूण - पालिकेच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी भाजपकडून काँग्रेसला देण्यात येणारी सर्व पदे काँग्रेसने नाकारली आहेत. शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ, अशी घोषणा माजी खासदार नीलेश राणे यांनी आज चिपळूण येथील पत्रकार परिषदेत केली.

पालिकेच्या कौन्सिलची गुरुवारी (ता. २९) विशेष सभा आहे. या सभेमध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी चिपळुणात पत्रकार परिषद घेतली. श्री. राणे म्हणाले की, पालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांसमोर गेलो होतो. मतदारांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले; मात्र स्पष्ट बहुमत कुणालाही मिळाले नाही. पुन्हा निवडणुका घेऊन वेळ आणि पैसा वाया जाऊ नये म्हणून आम्ही भाजपला काही अटींवर बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने आम्हाला उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापतिपद देण्याची तयारी केली होती. आम्ही सर्व पदे नाकारली आहेत. केवळ चिपळूण शहराच्या विकासासाठी आम्ही भाजपला सहकार्य करू. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. शहराच्या विकासासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निधी आणावा. तेथे आमचे भाजपला सहकार्य राहील. तसेच पालिकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी भाजपला आम्ही सहकार्य करू. जनतेच्या विरोधात भाजप गेली, तर आमचे त्यांना सहकार्य राहणार नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरप्रमुख परिमल भोसले, नगरसेवक सुधीर शिंदे, करामट मिठाघरी, संजीवनी शिगवण, राजेश वाजे, वैभव विरकर, प्रफुल्ल पिसे, कुंदन खातू आदी उपस्थित होते. 

कदमांना देण्यासारखे काहीच नाही
माजी आमदार रमेश कदम यांना काँग्रेसमध्ये घेणार का, असा प्रश्‍न नीलेश राणेंना केला असता ते म्हणाले, ते मोठ्या लोकांच्या संपर्कात असतात. त्यांना देण्यासारखे काँग्रेसकडे काहीच नाही. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये येणार नाहीत.

नाराज लियाकत शाह अनुपस्थित
चिपळूण पालिकेत काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आणण्यासाठी किंगमेकरची भूमिका बजावणारे लियाकत शाह काँग्रेसमध्ये नाराज आहेत. माजी खासदार नीलेश राणेंच्या दौऱ्यात अनुपस्थित राहून त्यांनी आपली नाराजी दाखवून दिली. याबाबत राणेंना विचारले असता लियाकत आमचेच असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचा स्वीकृत सदस्य अद्याप ठरलेला नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Congress rejected dy. mayor & chairman post