घातक प्रवृत्तींविरोधात काँग्रेसचा लढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress

रत्नागिरी : घातक प्रवृत्तींविरोधात काँग्रेसचा लढा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी (चिपळूण) : देशाचे आधारस्तंभ म्हणून तरुणांकडे पाहिले जाते; मात्र काही घातक प्रवृत्ती तरुणांना हेरून त्यांच्यात द्वेषाची भावना पसरवण्याचे काम करत आहेत. काँग्रेसने अशा प्रवृत्तींविरोधात लढा सुरू केला आहे. त्यामुळे तरुणांनी विचलित न होता काँग्रेसच्या या लढ्यात पुढाकार घ्यावा, अशी साद चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी तरुणांना घातली.

शहरातील पालोजी मोहल्ला येथे सोमवारी (ता. १५) काँग्रेसची कार्यकर्ता बैठक झाली. या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या बैठकीला तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. देशात अराजकता माजवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. महागाई आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करून समाजात तेढ निर्माण करण्याचे घातक अस्त्र वापरले जात आहे. त्यांच्या या कुकर्माला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मोदी सरकारच्या कारभाविरोधात मैदानात उतरले आहेत. जनजागरण अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्याची मोहीम काँग्रेसने महाराष्ट्रातही सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन काँग्रेसची विचारधारा पोहचवण्याचे काम केले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करून मोदी सरकार महागाई आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सर्वसामान्यांना विचलित करत आहे. यात त्यांच्याकडून तरुणांवर अधिक टार्गेट केले जात आहे. समाजात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र तरुणांनी आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण देशाचे भवितव्य तुमच्याच हाती आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या खोट्या प्रचाराला आणि देशातील महान नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस आता मैदानात उतरली आहे. तरुणांनीही या लढ्यात सहभागी होऊन देश अबाधित ठेवण्यासाठी योगदान द्यायला हवे. काँग्रेस कायम पाठीशी राहील, असेही यादव म्हणाले.

संघर्षाची तयारी ठेवा !

सन्मानाच्या अनेक पदांचा त्याग करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले संपूर्ण महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. काँग्रेसने आपल्याला पदे केवळ मिरवण्यासाठी दिलेली नाहीत. त्यामुळे आपणही स्वस्थ बसून चालणार नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपल्या भावी पिढीला न्याय मिळेल, असेही या वेळी प्रशांत यादव म्हणाले.

loading image
go to top