Kokan पुस्तकांच्या सतत सान्निध्यात राहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला

Kokan : पुस्तकांच्या सतत सान्निध्यात राहा

मालवण : प्रत्येक भाषा ही तिच्या बोली भाषेतून आलेल्या म्हणी आणि वाक्प्रचारातून समृद्ध होत असते. राजभाषा असलेल्या मराठीलाही बोली भाषेनेच समृद्ध केले आहे. भाषा आणि बोलीभाषा यांच्यातून आलेल्या शब्दांमध्ये अनेक अर्थ दडले असल्याने त्याचा विद्यार्थ्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास करावा. पुस्तकातील वाचन कायम स्मरणात राहते. वाचलेले एखादे पुस्तकही आयुष्य बदलून टाकू शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहावे, असे प्रतिपादन कोमसापचे मालवण तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी येथे केले.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या परीक्षेचा काळ सुरू असल्याने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने भंडारी हायस्कूल येथे कोमसाप शाखा मालवणच्या सहकार्याने ''साहित्यिक आपल्या भेटीला-भाग १'' या कार्यक्रमांतर्गत साहित्यिक आणि कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ''म्हणींचे मूळ आणि वाक्प्रचारांचे कुळ'' असा अनोखा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे सुरेश ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच सरस्वती पूजन करून व

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार जॉन नरोना, प्रशालेचे मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, सहाय्यक शिक्षक आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सहाय्यक शिक्षिका सुनंदा वराडकर, संजना सारंग, आर. बी. देसाई, अरविंद जाधव आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापक वामन खोत यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. सहाय्यक शिक्षिका सुनंदा वराडकर यांनी परिचय केला. यावेळी सुरेश ठाकूर यांचा जॉन नरोना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नरोना यांनीही वाचनाचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी, सारंग यांनी आभार मानले.

सुरेश ठाकूर : ‘कोमसाप’तर्फे मालवणात वाचन प्रेरणा दिन

भारतात १२१ भाषा

जगात ७११७, तर भारतात १२१ भाषा आहेत. त्यात राजभाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेसारख्या २२ भाषा आहेत. या भाषांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पुस्तकांच्या वाचनामुळे माणूस समृद्ध बनतो. वाचन संस्कृतीच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी ठाकूर यांनी केले. तसेच मराठी भाषेतील प्रचलित म्हणी आणि वाक्प्रचारांचे अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगताना शाहीर साबळे यांच्या म्हणी आणि वाक्प्रचारांवर आधारित असणारे गाणे गात विद्यार्थ्यांनाही त्यात सहभागी करून घेतले.