घराचे स्वप्न पुन्हा महागले

रिअल इस्टेटमध्ये तेजी; गुंतवणूकदारांत अद्यापही धास्ती
construction materials inflation dream of a house became expensive kankavli
construction materials inflation dream of a house became expensive kankavlisakal

कणकवली : कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडात काम बंद असलेली निवासी संकुले आणि घर बांधकामाला यंदा उन्हाळी हंगामामध्ये वेगाने सुरुवात झाली; मात्र बांधकामासाठी आवश्यक साहित्यामध्ये ३५ ते ४० टक्क्यांपेक्षा अधिक दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना घर बांधकाम करताना आर्थिक फटका बसत आहे. त्यातच मजुरी वाढल्याने घराचे स्वप्न महागले आहे. जगभरामध्ये घडणाऱ्या विविध घटनांचा दूरगामी परिणाम सातत्याने रियल इस्टेट क्षेत्रावर होतो. त्यातच इंधन दरवाढ ही बांधकाम व्यावसायिकांच्या मुळावरच येते. गेल्या दोन वर्षानंतर रिअल इस्टेट व्यवसाय, निवासी संकुल, स्वतःचे घर बांधकामाचे काम ही कोरोनामुळे ठप्प पडली होती.

या काळात परप्रांतातील मजूर वर्ग आपल्या गावाकडे परतला होता. यंदा मात्र कोरोनाचे सावट कमी झाले आहे. जानेवारीपासून शाळा महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे परराज्यातील बांधकाम क्षेत्राला लागणारे कुशल व अकुशल मजूर काही प्रमाणामध्ये जिल्ह्यात परतले आहेत. त्यामुळे बहुतांशी गावांमध्ये आता घर दुरुस्ती किंवा नव्याने घराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. जानेवारीपासून घर बांधकामाला सुरुवात झाली तेव्हा सिमेंटचे दर ३०० ते ३२० पर्यंत होते. सध्या सिमेंट हे ३४० ते ३६० रुपयांवर पोहचले. वाळूचे दरही प्रति ब्रास तीन हजारापर्यंत पोहचले आहेत. बांधकामासाठी लागणारे स्टील सळी ६० ते ६५ रुपये होती. सध्या स्टीलचा दर ८२ ते ८४ रुपये किलोवर पोहोचला आहे. प्लबिंगसाठी लागणाऱ्या पाईपचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. बांधकाम क्षेत्रासाठी लागणारे साहित्य कमालीचे वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न आर्थिकदृष्ट्या महागडे झाले आहे. घराच्या डागडुजीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीतही कमालीची वाढ झाली आहे. सिमेंटच्या दरवाढीबरोबरच टाईल्स आणि इतर बांधकाम साहित्यातही दरवाढ झाली आहे.

रियल इस्टेट क्षेत्राला यंदा सुगीचे दिवस आले होते; मात्र डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीमुळे या क्षेत्रातील मजुरी, कुशल कामगार आणि वाहतूक कमालीची वाढली आहे. साहजिकच फ्लॅट खरेदी करणाऱ्या नागरिकांनाही या दरवाढीचा फटका बसत आहे. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांनाही चांगले दिवस आले आहेत. गेल्या दोन वर्षापासून ठप्प असलेले रिअल इस्टेट क्षेत्रातील खरेदी-विक्रीचे व्यवहार यंदा वेगाने सुरू झाले; मात्र अपुरा मजूर पुरवठा आणि वाढलेले बांधकाम साहित्य यामुळे खरेदी दरात कमालीची वाढ झाली आहे. बांधकाम क्षेत्राला सुगीचे दिवस येत असताना गुंतवणूकदार मात्र काहीशा भयभीत आहे. वाढत्या दरवाढीमुळे घर खरेदी करणाऱ्यांनी आपला हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम पुढच्या खरेदी व्यवहारांवर होण्याची शक्यता आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक ऑफर्स

जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रामध्ये गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात खंड पडला होता. आता या बांधकाम क्षेत्राला बळकटी आली आहे; मात्र रिअल इस्टेट क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध प्रकारच्या ऑफर्स आणि सूट जाहीर केल्या आहेत. तशा जाहिरातीही झळकत आहेत. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याला तरी रिअल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे.

"इतर खर्च वाढल्याने बांधकाम साहित्यामध्ये दरवाढ झाली आहे. दोन वर्षानंतर बांधकाम साहित्यातील प्रत्येक घटकांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कोरोना कालावधीमध्ये बांधकाम साहित्याची खरेदी फारशी होत नव्हती. यंदा मात्र जानेवारीपासून मार्चपर्यंत घर बांधकाम किंवा निवासी संकुले बांधकामे सुरू झाली आहेत; मात्र पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि युद्धाचा परिणाम म्हणून बांधकाम क्षेत्रातील साहित्यामध्ये बऱ्यापैकी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकही अडचणीत सापडला आहे."

- महेंद्र वाळके, बांधकाम साहित्य विक्रेते, कनेडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com