काम पूर्ण, पण खारेपाटण रेल्वे स्थानक केव्हा होणार कार्यान्वित ?

Construction Work Of Kharepatan Railway Station Is Complete
Construction Work Of Kharepatan Railway Station Is Complete

खारेपाटण ( सिंधुदुर्ग )  - येथील रेल्वे स्थानक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जानेवारी 2020 पासून हे स्थानक कार्यान्वित होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली; मात्र या स्थानकात किती एक्‍स्प्रेस गाड्यांना थांबा असेल याबाबतची निश्‍चिती झालेली नाही. सध्या रेल्वे स्थानक इमारतीची रंगरंगोटी, रूळ जोडणी, प्रवासी शेडची कामे सुरू आहेत. 

कोकण रेल्वे मार्गावर 1998 पासून नियमित रेल्वे सेवा सुरू झाली. त्या वेळेपासूनच खारेपाटण येथे रेल्वे स्थानक होण्याची मागणी येथील पंचक्रोशीतून केली जात होती. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी चार वर्षांपूर्वी खारेपाटण रेल्वे स्थानकाला मंजुरी दिली. तर गेली दोन वर्षे रेल्वे स्थानक उभारणीचे काम केले जात आहे.  

खारेपाटण परिसरातील प्रवाशांना रेल्वेतून मुंबई गाठायची झाल्यास तब्बल 40 किलोमीटर अंतर पार करून कणकवली स्थानक गाठावे लागते. त्यामुळे खारेपाटण रेल्वे स्थानक केव्हा कार्यान्वित होते याची प्रतीक्षा खारेपाटणसह लगतच्या अनेक गावांतील प्रवाशांना होती. येथील रेल्वे स्थानकात रेल्वे मार्गिका, रेल्वे स्थानक उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. तर स्थानकाची रंगरंगोटी व इतर किरकोळ कामे शिल्लक आहेत.

पंचवीस ते तीस गावांतील प्रवाशांना होणार फायदा

कोकण रेल्वेची मुख्य रेल्वे लाईन स्थानकाच्या पटरीला जोडल्यानंतर हे स्थानक कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर काही काळाचा मेगाब्लॉक देखील घ्यावा लागणार आहे. येत्या महिन्याभरात ही कामे पूर्ण होण्याची शक्‍यता रेल्वे प्रशासनाकडून व्यक्‍त करण्यात आली. खारेपाटण शहर राजापूर, वैभववाडी आणि कणकवली तालुक्‍यातील अनेक गावांशी जोडले गेले आहे. खारेपाटण स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर येथील पंचवीस ते तीस गावांतील प्रवाशांना या स्थानकाचा फायदा होणार आहे. 

खारेपाटण स्थानकापासून विद्युतीकरण 

विद्युतीकरणाचेही काम सुरू खारेपाटण येथे जिल्ह्याचे मुख्य वीज केंद्र आहे. येथूनच कोकण रेल्वेलाही वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने खारेपाटण स्थानकालगत वीज सबस्टेशनचीही उभारणी केली जात आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण कामाने गती घेतली असून लवकर खारेपाटण स्थानकापासून विद्युतीकरणही केले जाणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com