पुलांच्या ऑडिटसाठी कन्सलटन्सीची नेमणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांचे लवकरच स्ट्रक्‍चरल ऑडिट होणार आहे. त्यासाठी ध्रुव कन्सलटन्सीची नेमणूक केंद्र शासनाने केली आहे. पेण येथून पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम सुरू होणार असल्याचे महामार्ग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावर 21 ब्रिटिशकालीन पूल आहेत.

कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांचे लवकरच स्ट्रक्‍चरल ऑडिट होणार आहे. त्यासाठी ध्रुव कन्सलटन्सीची नेमणूक केंद्र शासनाने केली आहे. पेण येथून पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम सुरू होणार असल्याचे महामार्ग विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गावर 21 ब्रिटिशकालीन पूल आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीचा पूल कोसळून दोन एस.टी. बसेस आणि दोन खासगी वाहने वाहून गेली होती. यानंतर ब्रिटिशकालीन पुलांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. दुर्घटना घडल्यानंतर तातडीने सर्वच पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट होणार असल्याची घोषणा देखील राज्य आणि केंद्र शासन पातळीवर करण्यात आली होती. परंतु स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यासाठी शासनाकडे आवश्‍यक ती यंत्रसामग्रीच नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर स्ट्रक्‍चरल ऑडिटसाठी निविदा मागविण्यात आल्या.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणांतर्गत सध्या 10 पुलांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या दहा पुलांची उभारणी पूर्ण करून त्यावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन महामार्ग विभागाने केले आहे; मात्र जुने ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल उभे करणार की आहे त्याच पुलांचा भक्‍कम आधार देऊन त्यांचे रुंदीकरण करणार याबाबतचे धोरण स्ट्रक्‍चरल ऑडिटनंतरच ठरणार आहे.
सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने दोन तीनपदरी पूल बांधण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले. त्याच धर्तीवर इतर ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांतून होत आहे. कारण महामार्गावरील पुलांच्या दुरुस्तीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आल्यानेच महाड दुर्घटनेचा प्रकार झाल्याचे निश्‍चित झाले होते. परिणामी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यात कोकणपट्टा हा दुर्गम-दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश म्हणून गणला जातो. ब्रिटिशांनी त्यावेळी पुलांची उभारणी केली. हे पूल तत्कालीन उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कौशल्यपूर्णरीत्या बांधकाम केले गेले होते.

इतकी वर्षे लोटूनही महामार्गावरील हे पूल आपले अस्तित्व टिकवून आहेत. मात्र 83-84 वर्षांचा कालावधी लोटल्याने, तसेच पुलांवर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात दळणवळणात वाढ झाली आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीचा भार लक्षात घेता या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ब्रिटिशांनी तत्कालीन तंत्रज्ञानावर दगडी स्वरूपात पुलांची बांधणी केली. या पुलांच्या बांधणीमध्ये दगडी पिलर व दगडी कमानीचा वापर दिसून येतो; मात्र आता हे काम खिळखिळे होत असल्याचे या दुर्घटनेवरून प्रकर्षाने समोर येत आहे.

सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने राज्यातील सर्व महामार्गांवरील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाईल, असे जाहीर केले होते; परंतु त्याला मुहूर्त मिळाला नव्हता. अखेर 3 नोव्हेंबर 2016 ला केंद्रस्तरावरून पुलांचे ऑडिट करण्यासाठी ध्रुव कन्सलटन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.

ब्रिटिशकालीन पुलांचे कंडिशनल सर्वेक्षण याद्वारे केले जाणार आहे. कोकणातील रत्नागिरी- सिंधुदुर्ग या दक्षिण विभागात मुंबई- गोवा महामार्गावर एकूण 21 पुलांची उभारणी नद्यांवर करण्यात आली आहे. यापैकी 1947 पूर्वी ब्रिटिशकाळात व त्यानंतर झालेल्या पुलांचा समावेश आहे. या पुलांमध्ये एकंदरीत 15 पूल हे ब्रिटिशकालीन दगडी बांधकामाचे असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे.

यापूर्वी सुमारे 1994 मध्ये महामार्गावरील जुन्या पुलांचे सुरक्षिततेविषयी मॅपॅनिकल सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत अशाप्रकारचे सर्वेक्षण झालेले नव्हते. सावित्री दुर्घटनेनंतर प्रथमच स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार आहे. राज्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला गेला आहे. या ऑडिटमध्ये पुलांचा डाटा तयार करणे, सध्याची पुलांची स्थिती, क्षमता आणि पूल किती वाहतूक सहन करू शकतो याची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यासाठी मोबाइल तपासणी यंत्रणेचा वापर करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

ध्रुव कंपनीकडून कोकणातील पुलांच्या सर्वेक्षणाला सुरवात केली आहे. पेण येथील काही पुलांची त्यांनी तपासणी केली आहे. तेथून पुढे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही कंपनी येणार आहे. हे ऑडिट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पुलांच्या क्षमतेविषयी माहिती मिळणार आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्या अंतर्गत ब्रिटिशकालीन पुलांना पर्यायी पूल बांधण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. ते काम पूर्ण होईपर्यंत ब्रिटिशकालीन पुलांची दुरुस्ती किंवा डागडुजी करून ते सक्षम ठेवण्यात येणार असल्याचेही महामार्ग प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: consultancy audit of bridges