माझ्या वक्तव्याचा विपर्यास : केसरकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हॉस्पिटल व संदर्भात मी कोणते चुकीचे वक्तव्य केले नव्हते. उलट त्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यात आल्यानंतर हॉस्पिटलला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते, कौतुक केले होते. 

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या रुग्णालयाच्या विरोधात मी कोणतेही विधान केलेले नाही. उलट शुभेच्छा दिल्या. परंतु माझ्या वक्तव्याचा काही लोकांकडून विपर्यास करण्यात आला, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.

केसरकर यांनी नारायण राणे यांच्या हॉस्पिटलच्या विरोधात टीका केल्यावरून गेले काही दिवस जिल्ह्याचे राजकारण तापले होते. यावरून नारायण राणे यांनी केसरकर यांना वकिलांच्यावतीने नोटीस बजावणार असल्याचे इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर वर जिल्हा दौऱ्यावरअसलेल्या केसरकर यांना विचारणा केली असता आपली भूमिका मांडली

ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हॉस्पिटल व संदर्भात मी कोणते चुकीचे वक्तव्य केले नव्हते. उलट त्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यात आल्यानंतर हॉस्पिटलला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते, कौतुक केले होते.  चांगल्याला चांगले म्हणणे आणि जनतेच्या हितासाठी असेल तर नेहमी त्याच्या पाठीशी राहणे ही माझी संस्कृती आहे. मात्र, कोणीतरी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. काही वृत्तपत्रात चुकीची माहिती छापू लागली. त्यामुळे राणेंचा गैरसमज झाला असावा. परंतु विरोधात बोललो नाही. त्यामुळे पुढचा प्रश्नच येत नाही, असे केसरकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न सोडण्यात येणार आहे. मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल होण्यास वेळ लागणार आहे त्यामुळे अधिवेशनानंतर खास निधीची तरतूद करून जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम उपलब्ध करून दिली जाणार आहे. सावंतवाडी येथे होणाऱ्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी चार जागा बघण्यात आल्या आहेत. त्यातील नेमकी कोणती जागा चांगली याबाबत विचारविनिमय सुरू असून, लवकरच याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या 

नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात, यावा अशा मागणीचे निवेदन केसरकर यांना दिले. यावेळी नगरसेवक आनंदी निवृती, सुरेंद्र बांदेकर, संजय पेडणेकर, शब्बीर मणियार, प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Contradiction of my statement says MoS Kesarkar