"जलवर्धिनी'ने कोपनहॅगन विद्यापीठ प्रभावित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

गुहागर - कोकणात पाणी साठवण्याचा विचार रुजविणारे जलवर्धिनीचे काम कौतुकास्पद आहे. आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत, अशा शब्दात कोपनहॅगन विद्यापीठ, डेन्मार्कचे भूगर्भशास्त्र व पाणी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख मार्टीन एल. लॅस्सेन यांनी उल्हास परांजपे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.

गुहागर - कोकणात पाणी साठवण्याचा विचार रुजविणारे जलवर्धिनीचे काम कौतुकास्पद आहे. आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत, अशा शब्दात कोपनहॅगन विद्यापीठ, डेन्मार्कचे भूगर्भशास्त्र व पाणी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख मार्टीन एल. लॅस्सेन यांनी उल्हास परांजपे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. परांजपे यांनी शोधलेल्या फेरोसिमेंट तंत्रज्ञानावर आधारित पाणी बचतीची माहिती घेण्यासाठी विद्यापीठाची टीम मुंबईत आली होती. 

गेली काही वर्षे उल्हास परांजपे जलवर्धिनी संस्थेमार्फत पाणी बचतीच्या सोप्या तंत्रज्ञानाचा प्रचार करत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी पाण्याची साठवण करावी यासाठी जलवर्धिनी प्रयत्नशील आहे. कमी किमतीत आणि कमी कालावधीत तयार होणाऱ्या फेरोसिंमेट टाक्‍या उभारणीचे प्रशिक्षण संस्थेमार्फत दिले जाते. आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हे तंत्रज्ञान वापरून पाण्याच्या टाक्‍या बांधल्या जात आहेत. प्रसंगी जलवर्धिनीतर्फे टाकी बांधण्यासाठी अनुदानही दिले जाते. जलवर्धिनीच्या या कामाची माहिती इंटरनेटद्वारे जगात पसरली आहे. 

जगातील अनेक तज्ज्ञ मंडळी जलवर्धिनीच्या कार्याची दखल घेत आहेत. याचाच प्रत्यय उल्हास परांजपेंना शनिवारी (ता. 28) आला. डेन्मार्क येथील कोपेनहॅगन विद्यापीठातील भूगर्भशास्त्र व पाणी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख मार्टीन एल. लॅस्सेन यांनी परांजपे यांची दादर येथील कार्यालयात भेट घेतली. त्यांचे काम समजून घेतले. तसेच ग्रामीण भागात प्रत्यक्ष काम करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले. आगामी काळात या विद्यापीठाची टीम फेरोसिंमेट तंत्रज्ञानातून टाकी बांधण्यासाठी कोकणात येणार आहे. 

विदेशी विद्यापीठ आमच्या कामाची दखल घेत असल्याने आमचा उत्साह वाढला आहे. कोपनहॅगन विद्यापीठाने सहकार्य केल्यास पाणी साठविण्याचे क्षेत्र वाढविण्यासाठी अधिक वेगाने काम करता येईल. 

- उल्हास परांजपे, जलवर्धिनी प्रणेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Copenhagen University impressed by Jalvardhini work