सिंधुदुर्गात कशाचे चिंतेचे सावट आहे वाचा...

मंगळवार, 26 मे 2020

गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात केवळ 20 अहवाल मिळाले. त्यातील तब्बल नऊ पॉझिटिव्ह होते. सध्या 284 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. 

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोरोना चाचणीच्या दीर्घकाळ प्रलंबित अहवालांमुळे चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एकीकडे चाकरमान्यांचा ओघ वाढत असताना स्वॅब अहवाल फार धिम्या गतीने मिळत आहेत. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात केवळ 20 अहवाल मिळाले. त्यातील तब्बल नऊ पॉझिटिव्ह होते. सध्या 284 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. 

जिल्ह्यात दिवसाला 60 नमुने तपासणी होईल, असे कोल्हापूर येथील लॅबकडून या आधी सांगितले असताना तीन दिवसांत अवघे 20 अहवाल मिळाले आहेत. त्याबाबतच येथे चिंता व्यक्त होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, पणदूर येथील 52 वर्षीय महिलेचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह होता. या महिलेच्या संपर्कात आलेल्या 40 व्यक्तींना शोधून काढले आहे. त्यातील 30 जण अतिजोखमीचे आहेत. त्यापैकी 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आणखी 17 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. आज 11 अहवाल कोल्हापूरच्या प्रयोगशाळेतून आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. 

जिल्ह्यात सध्या चार कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्‍यातील डामरे, वैभववाडी तालुक्‍यातील नाधवडे, मालवण तालुक्‍यातील हिवाळे आणि कुडाळ तालुक्‍यातील पणदूरचा समावेश आहे. पणदूरमध्ये पणदूर, हुमरमळा, अणावचा समावेश आहे. त्यामध्ये 282 कुटुंबातील एक हजार 341 व्यक्तींची तपासणी होणार आहे. जिल्ह्यात एकूण 22 हजार 8 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. पैकी 398 व्यक्ती शासकीय कक्षात आहेत. गावपातळीवर 21 हजार 610 व्यक्तींना गावपातळीवर क्वारंटाईन केले आहे. जिल्ह्यात प्रवेश केलेले इतर सर्व होम क्वारंटाईन आहे. 

पालकमंत्र्यांनी साधला संवाद 
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे अहवाल 19 पासून पेंडिंग आहेत. यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कात येऊन निगेटिव्ह व्यक्तीही पॉझिटिव्ह होण्याची शक्‍यता आहे. याकडे पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ""याबाबत मी कोल्हापूरच्या प्रयोगशाळेशी आजच बोललो आहे. त्यांना रोजच्या रोज अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.'' 
 

जिल्ह्याची स्थिती 
*कोरोनाग्रस्तांची संख्या....17 
*सध्या उपचार घेणारे .....10 
*कोरोनामुक्त झालेले......7 
*संस्थात्मक क्वारंटाईन......22 हजार 8 
* पैकी गाव पातळीवर ....21 हजार 610 
* पैकी शासकीय कक्षात ....398 
*तपासणीसाठी पाठविलेले नमुने...1435 
*अहवाल आलेले.....1151 
* सोमवारी पाठविलेले नमुने...67 
* प्रलंबित अहवाल......284 
* आयसोलेशन कक्षात दाखल.....सध्या 87 
* दिवसभरात तपासणी झालेल्या व्यक्ती....4 हजार 180 
* अखेर जिल्ह्यात आलेले नागरिक....40 हजार 527 
* रविवारी दाखल झालेले नागरिक....2 हजार 88