सावंतवाडी कारागृहात कोरोनाचा शिरकाव, तीन कैदी बाधित 

भूषण आरोसकर
Sunday, 6 September 2020

शहरातील खासकीलवाडा, माठेवाडा येथे प्रत्येकी एक, असे एकूण पाच रुग्ण आज आढळून आले. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या एकूण 105 वर पोहोचली आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील पालिका, पोलिस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय पाठोपाठ आता कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील कारागृहातील तीन कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरात आज दिवसभरात पाच रुग्ण सापडल्याची माहिती डॉ. उमेश मसुरकर यांनी दिली. 

शहरामध्ये आता शासकीय कार्यालयातही कोरोनाचे रुग्ण सापडून येत आहेत. यापूर्वी तहसील कार्यालयातील दोन तलाठी, एक मंडळ अधिकारी तर शहरात वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्‍टर, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी आदींना कोरोनाची बाधा झाली आहे. आता येथील कारागृहातही कोरोना रुग्ण आढळून आले असून तीन कैदी आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

शहरातील खासकीलवाडा, माठेवाडा येथे प्रत्येकी एक, असे एकूण पाच रुग्ण आज आढळून आले. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या एकूण 105 वर पोहोचली आहे. शहरात आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून 57 रुग्ण सक्रिय आहेत. तब्बल 48 ठिकाणी कंटेन्मेंट झोन केले असून पॉझिटिव्ह रुग्णावर ओरस तसेच शेर्ला येथील कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पालिकेकडून विशेष खबरदारी बाळगण्यात येत असून कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने काहीशी भीती व्यक्त केली जात आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient found in Sawantwadi jail