ब्रेकिंग : सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा प्रवेश ; जिल्ह्यात पहिला रुग्ण सापडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

दोन दिवसांपूर्वी मेंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा पॅसेंजर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. त्याच ट्रेनमच्या बोगीतून कणकवलीत उतरलेल्या सहा पॅसेंजरमधील एक कोरोना बाधित झाल्याचे व त्याचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याचे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत सायंकाळी जाहीर केले.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवलीमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला असून १९ मार्चला मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना कर्नाटक मधील कोरोना बाधित रुग्णांशी संपर्क आल्याने कोरोना बाधित झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये विलगिकरण कक्षामध्ये ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ही माहिती जाहीर केली.

दोन दिवसांपूर्वी मेंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा पॅसेंजर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. त्याच ट्रेनमच्या बोगीतून कणकवलीत उतरलेल्या सहा पॅसेंजरमधील एक कोरोना बाधित झाल्याचे व त्याचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याचे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत सायंकाळी जाहीर केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्यचिकित्सक चाचुरकर व  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मुंबई सीएसटीवरून सुटलेल्या बेंगलोर एक्स्प्रेसमधील एका बोगीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले होते. त्याबोगीमधून रत्नागिरीत पंधरा पॅसेंजर व कणकवलीत सहा पॅसेंजर उतरले होते. कणकवलीत उतरलेल्या दोन जणांचे जिल्हा प्रशासनाने होम कोरंटाइन केले होते. कणकवली स्टेशनला उतरलेल्या या प्रवाशांपैकी तीन प्रवासी पुन्हा मुंबईकडे माघारी गेले आहेत तर यातील एक प्रवासी आपल्या घरी होता. आरोग्य विभागाने शोध मोहीम राबवित या प्रवाशाची आई तसेच त्यालाही होम कोरंटाइन केले होते. त्याच्या आईला खोकलाअसल्यामुळे तीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे आणि मुंबईवरून आलेल्या त्याच्या मुलाचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रीपोर्ट आज दुपारी जिल्हा रूग्णालयाकडे प्राप्त झाला. या रिपोर्टनुसार हा मुंबईवरून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले आहे. त्या रुग्णावर आता जिल्हा रुग्णालयातील आयसोलेटेड कक्षात उपचार सुरू आहेत. मात्र त्याला अद्यापही आजारपणाची कोणतीच लक्षणे नसल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक चाचुरकर यांनी सांगितले. तसेच तिच्या आईचा रिपोर्ट मात्र कोरोना निगेटिव्ह आला आहे. तिला खोकल्याचा त्रास जाणवत असून तिच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत असेही जिल्हा शल्य चिकित्सकाने यावेळी सांगितले. 

दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत घाबरून जाऊ नये.  नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर पडू नये. तसेच एकमेकांशी संपर्क टाळावा व आपली काळजी घ्यावी. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांनी त्याच काळासाठी दक्षता घेऊन घराबाहेर पडावे असे आव्हाने जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केले. जिल्ह्यात सध्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत असून परजिल्ह्यातून येणाऱ्या  जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना अडविले जात नसून त्यांना यापुढे पासेस देण्याचीही व्यवस्था करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील काही बँकांच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध होत नसून त्याबाबतच्या सूचना बँकांना करण्यात येतील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient found in sindhudurg